– विश्व हिंदी दिनानिमित्त अखिल भारतीय हिंदी संस्था संघ तर्फे कर्तृत्वाचा गौरव
नागपूर :- भाषेतून सामान्य लोकांचा विश्वास प्राप्त करता येतो व कामकाजातही यश संपादित करता येते, असे उद्गार निवृत्त पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी येथे काढले. अखिल भारतीय हिंदी संस्था संघ, नवी दिल्ली आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज, शुक्रवारी विश्व हिंदी दिनानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या उत्कर्ष सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी भूषविले. याप्रसंगी मंचावर अखिल भारतीय हिंदी संस्था संघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष अजय पाटील होते.
हिंदी भाषेच्या विस्तार, प्रचार व प्रसारासाठी उल्लेखनीय कार्य करणार्या मराठी भाषिक महनीय व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी संबोधताना डॉ. भूषणकुमार उपाध्याय म्हणाले की, साहित्य वाचनाने नेहमी मला ताणतणाव मुक्त व आनंदी केले. भाषेतून भावनात्मक संबंध तयार होतात. माता, मातृभाषा व मातृभूमीला पर्याय नसतो. क्षेत्रीय भाषेचा सदैव आदर असला तरी संपर्क भाषा म्हणून हिंदीचे स्थान अढळ आहे. हिंदीतील शब्द, ध्वनी, छंद, रसातली ताकद अवर्णनीय आहे. डॉ. उपाध्याय यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात रश्मीरथी, निराला, शंकरप्रसाद, गोपालसिंग आदी कवींच्या रचनांचे दाखले दिले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी हिंदीने सर्वांना एकसूत्रात सक्षमपणे जोडले. हिंदीला राजभाषेचा दर्जा मिळण्याचे हे अमृतवर्ष आहे. आज हिंदी विश्वभाषेच्या गौरवपूर्ण स्तरावर आहे, असे उद्गार प्रास्ताविकात अजय पाटील यांनी काढले. भाषेच्या संदर्भातील प्रत्येक वक्तव्य जबाबदारीचे हवे. आजचा सोहळा ऋणमुक्त होण्यासाठी नव्हे, तर इतिहासात पुढे नोंद होणार्या नावांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे, असे आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. गिरीश गांधी यांनी नमूद केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र परिहार आणि आभारप्रदर्शन बाळ कुळकर्णी यांनी केले.
सत्कारमूर्तींमध्ये पंचभाषिक कवयित्री आशा पांडे, डॉ. अक्षयकुमार काळे, डॉ. कविता शनवारे, डॉ. वीणा दाढे, डॉ. लीना रस्तोगी, डॉ. भारती सुदामे, माधुरी राऊळकर, डॉ. हेमचंद्र वैद्य, भगवान वैद्य -प्रखर, इंदिरा हटवार, अशोक डोळस, डॉ. वसुधा पांडे, प्राचार्य नंदिनी जठार यांचा समावेश होता. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. अक्षयकुमार काळे यांनी, हिंदी उर्दूत दृढ जैविक नाते आहे. हिंदी भाषेत असाधारण स्वीकारक्षमता आहे. हिंदी उर्दू, मराठीला सहज पोटात घेते, असे उद्गार काढले. आशा पांडे म्हणाल्या की, हिंदी दिनानिमित्त भाषिक संस्कार अधिक घट्ट होतील. हिंदीत मिठास, उर्दूत एहसास, बंगालीत मधुमास, संस्कृतमध्ये आत्मविश्वास, मराठीत उल्हास, तर इंग्रजीत अधिवास आहे. सर्व भाषांना जोडूनच व्यक्तित्व व्यापक होते. ‘हिंदी का उजियारा’ ही स्वलिखित कविताही त्यांनी सादर केली. अन्य सत्कारमूर्तींनीही मनोगत व्यक्त केले.
मंचावर बाळ कुळकर्णी, अतुल दुरगकर, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे सचिव निलेश खांडेकर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्या साठी प्रगती पाटील, शुभदा फडणवीस, सणा पंडित, रेखा घिया, श्रीराम काळे, प्रकाश इटाळकर यांनी प्रयत्न केले.