यवतमाळ :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. जिल्ह्यात आजपर्यंत दोन टप्प्यात ६ लाख ९२ हजार ९८७ इतक्या महिला लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. लाभार्थ्यांना बॅंकेमार्फत लाभ दिला जात असल्याने बॅक खाते आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. ज्यांचे प्रमाणिकरण बाकी असेल त्यांनी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत प्रतिमाह 1 हजार 500 याप्रमाणे पात्र महिलांना लाभ दिला जातो. आतापर्यंत ६ लाख ९२ हजार ९८७ इतक्या महिला लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील ४ लाख ६५ हजार १०९ तर दुसऱ्या टप्प्यातील २ लाख २७ हजार ८७८ लाभार्थ्यांचा समावेश आहे. या योजनेची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक, पोस्ट खात्यात जमा करण्यात येते. हा लाभ आधार बेस्ड असल्याने लाभार्थ्यांचे बँक, पोस्ट खाते हे आधार सीडेड असणे अनिवार्य आहे. बँक खाते आधार सीडेड नसल्यास रक्कम जमा होण्यास अडचणी येतात. ज्या लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकृत व मान्य झाले आहे, परंतु योजनेचा लाभ खात्यात जमा झाला नाही त्यांनी आपले बँक खाते आधार सीडेड करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जर लाभार्थ्यांचे बँक खाते 6 महिन्यांपासून व्यवहार नसल्याने सक्रीय नसेल तर सदर खात्याची केवायसी करून व खाते आधार सीडेड करून घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे बँक खाते आधार सीडिंग होण्यात काही अडचणी असल्यास लाभार्थी पोस्टल बँकेचे खाते सुद्धा काढू शकतात. जरी लाभार्थ्यांनी योजनेच्या फॉर्ममध्ये इतर बँकेचा तपशील दिला असला तरी ते आताही पोस्टाचे खाते काढू शकतात. जेणेकरून सदर खाते आधार सीडेड असल्याने त्यामध्ये योजनेची रक्कम जमा होण्यास अडचण येणार नाही, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.