यवतमाळ :- महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी उपाध्यक्ष श्यामराव काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाली.
पणन महासंघ ही महाराष्ट्रातील खरेदी- विक्री व पणन संस्थांनी शिखर संस्था असून राज्यातील 827 अ वर्ग सहकारी संस्था पणन महासंघाचे सभासद आहेत. संस्थेने आजवरच्या काळात शेती व शेतकरी आणि ग्राहक यांच्या विकासासाठी आणि हितसंरक्षणासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेली आहे. पणन महासंघाने शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या असून शासनाने पणन महासंघावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहवाल सालामाध्ये धान व भरडधान्य व तेलबिया खरेदी, खत व पशुखाद्य विक्रीचे काम केलेले आहे. शेतीमालाला लाभप्रद व वाजवी भाव मिळावा यासाठी विविध भरडधान्य व तेलबिया, कडधान्ये यांची केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराने राज्यात खरेदी केली आहे. नाफेड महाराष्ट्र शासन व एफसीआय करीता पणन महासंघामार्फत कडधान्य तुर, उडीद, मुंग, चणा व तेलबियामध्ये सोयाबीन खरेदी झालेली आहे. आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान्याची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांनी यावेळी दिली.
यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष रोहीत निकम, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे पाटील, सरव्यवस्थापक प्रभाकर सावंत, नितीन यादव, देवीदास भोकरे यांच्यासह महासंघाचे संचालक मंडळ, पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते, असे जिल्हा पणन अधिकारी यांनी कळविले आहे.