नागपूर :- ‘ओवरियन कॅन्सर जनजागृती महिन्या’च्या औचित्याने विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवार, ३० सप्टेंबर रोजी महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांकरिता ‘ओवरियन कॅन्सर- लक्षणे, निदान आणि उपचारपद्धती’ विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.
महसूल व वन विभागाच्या अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमामध्ये कॅन्सरशी यशस्वी लढा देणाऱ्या शासकीय रुग्णालय व महाविद्यालय नागपूरच्या मायक्रोबायोलॉजी विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. संगिता खेडीकर यांनी प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन व स्वानुभव कथन केले. या कार्यक्रमातील प्रमुख मार्गदर्शक प्रसूती आणि स्त्री रोगतज्ञ डॉ. स्नेहल समर्थ यांनी उपस्थितांना या आजाराशी निगडीत सादरीकरणाच्या माध्यमातून दैनंदिन जीवनात अवलंबायच्या जीवनशैली विषयी मार्गदर्शन केले.
चाळीशीनंतर महिलांना ओवरी, ब्रेस्ट, सर्वायकल या बद्दल विशेषत्वाने काळजी घेण्याबद्दल मार्गदर्शन यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. वार्षिक स्क्रिनिंग करून घेण्यासह प्राधान्याने आरोग्याकडे लक्ष देणे, बारिक-सारिक लक्षणांकडे दुर्लक्ष नकरणे, कॅन्सरचे निदान झाल्यास वेळीच योग्य उपचार घेवून त्यास खंबीरपणे पुढे जावे, असा मोलाचा संदेश ही यावेळी देण्यात आला.
निरोगी राहणे महत्वाचे असून याचे सतत स्मरण ठेवावे. महिलांच्या कँसरबाबत पुरुषांनाही योग्य माहिती असावी, अशी अपेक्षा डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दीपाली मोतियेळे यांनी प्रास्ताविक केले. भुसुधार विभागाच्या सहायक आयुक्त शिल्पा सोनोले यांनी सूत्रसंचालन केले तर कस्तूरी वैद्य यांनी आभार मानले.