नागपूर :- वीजबिलाचा भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने सातत्याने नवनवीन सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. महावितरणने स्वतःचे पेमेंट वॉलेट सुरू केले असून आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या पतसंस्था तसेच किराणा, मेडीकल व जनरल स्टोअर्स चालकांना वॉलेटधारक होता येईल. यातून वीज ग्राहकांना विशेषतः ग्रामीण भागात वीजबिलाचा भरणा करणे सुलभ होण्यासह प्रतीबिल पावतीमागे 5 रुपये उत्पन्न मिळत असल्याने या पेमेंट वॉलेटच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.
असे होऊ शकता सहभागी
संपूर्ण पारदर्शक असलेल्या महावितरण पेमेंट वॉलेट योजनेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींनी आपल्या अर्जासह आधार कार्ड, पॅन कार्ड, व्यापारी असल्यास जीएसटी क्रमांक व दुकान नोंदणी क्रमांक, रहिवासी असल्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, रद्द केलेला धनादेश आदी कागदपत्रे महावितरणच्या संबंधित कार्यालयात सादर करायची आहेत. महावितरणकडे अर्ज प्राप्त झाल्यावर उपविभागीय कार्यालयाकडून पडताळणी करण्यात येणार आहे. आलेले सर्व अर्ज मुंबई मुख्य कार्यालयाकडे पाठविले जाणार असून, तेथून अर्जाला मंजुरी मिळणार आहे. अर्जदाराला सर्व माहिती त्याने नमूद केलेल्या ई-मेल आणि नोंदणी केलेल्या मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून मिळणार आहे. यासाठी अर्जदारास महावितरणच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. एकदा अर्जदारास पेमेंट वॉलेटच्याद्वारे पैसे स्वीकारण्याची परवानगी मिळाली की सुरुवातीस किमान पाच हजार रुपयांचे डेबिट, क्रेडिट कार्ड, मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून टॉपअप करावे लागणार आहे. वॉलेटधारक महावितरण मोबाईल ॲपमध्ये नोंदणी करून वीज ग्राहकांच्या देयकाची रक्कम स्वीकारू शकतील. वॉलेटच्या माध्यमातून देयकाचा शकतील. वॉलेटच्या माध्यमातून देयकाचा भरणा केल्यावर वीज ग्राहकास महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाईलवर पैसे भरल्याचा संदेश मिळणार आहे.
वॉलेटधारक महावितरणच्या ॲपमध्ये नोंदणी करून महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा करून घेऊ शकतील. वॉलेटमध्ये बिलाचा भरणा झाल्यानंतर संबंधित ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर बिल भरणा झाल्याचा एसएमएस तत्काळ मिळणार असल्याने ग्राहकांचे जागेवर समाधान होऊ शकेल. एकाच वॉलेटचा बॅलन्स वापरून विविध लॉग-ईनद्वारे वेगवेगळ्या व्यक्तींकडून वीजबिलाचा भरणा करून घेण्याची सुविधा वॉलेटमध्ये देण्यात आली असून याचा लेखाजोखा व कमिशन महिनाअखेर मुख्य वॉलेटमध्ये जमा केले जाईल. वॉलेटधारकास प्रती बिलामागे 5 रुपये कमिशन मिळणार असून महिना अखेरीस ते वॉलेटमध्ये जमा करण्यात येईल.
रोजगाराची संधी
कोणतीही सज्ञान व्यक्ती, दुकानदार, व्यापारी, वीज मीटर रीडिंग करणारी संस्था, महिला बचत गट, लघूद्योजक महावितरणचे वॉलेटधारक होऊ शकतात. या वॉलेटच्या माध्यमातून या सर्वांना महावितरणच्या ऊर्जा संकलन प्रणालीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी ही प्री-पेड आधारित संकलन यंत्रणा आहे. महिनाअखेरीस कमिशन अर्जदाराच्या वॉलेटमध्ये जमा होईल. महावितरण पेमेंट वॉलेटमुळे ग्रामीण भागात युवकांना रोजगाराची संधी मिळणार असल्याने शहरी व ग्रामीण भागातील अधिकाधिक पतसंस्था, दुकानदार यांनी वॉलेटधारक होण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.