नवी दिल्ली :- ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या विदर्भातली मनाली अनिल बोंडे यांच्या चित्र प्रदर्शनीचे मंगळवारी थाटात उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
राजधानीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र येथे हा उद्घाटन सोहळा पार पडला. ह्या कार्यक्रमाला भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त व्हाईस ॲडमिरल सतीशकुमार घोरमाडे, खासदार डॉ अनिल बोंडे, डॉ वसुधा बोंडे, मराठी प्रतिष्ठानचे विष्णु पाटील यांसोबत अनेक उद्योजकांची उपस्थिती होती. हे प्रदर्शन 12 व 13 मार्च या कालावधी दरम्यान भरण्यात आले आहे.
साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, औद्योगिक, प्रशासन यांसह चित्रांची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हे प्रदर्शन एक नवी पर्वणी ठरणार असल्याचा सुर उद्घाटनाप्रसंगी मान्यवरांकडून उमटल्याचे पहायला मिळाले. यावेळी सर्व मान्यवरांनी प्रदर्शनी परिसरात लावण्यात आलेल्या सर्व अप्रतिम कलाकृतींची पाहणी केली व मनालीचे तोंड भरून कौतूकही केले.
या प्रदर्शनीच्या शेवटच्या दिवशी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांनी या प्रदर्शनीला आज भेट दिली. सर्जक कलाकृतींचा कौतुक करत त्यांनी मनाली बोंडे यांना शुभेच्छा दिल्या.
विविध देशांच्या संस्कृती आणि कथांवर आधारित छायाचित्र प्रदर्शन प्रथमच राजधानीत भरवण्यात येणार आहे. जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्ली आणि त्रिवेणी चॅरिटेबल फाऊंडेशन अमरावती, यांच्या वतीने अमरावती येथील प्रसिद्ध युवती चित्रकार मनाली अनिल बोंडे यांच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या विषयावरील चित्रांचे प्रदर्शन 12 आणि 13 मार्च 2024 रोजी इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र येथे भरविण्यात आला आहे.
चित्रकार मनाली अनित बोंडे विषयी
चित्रकार मनाली बोंडे यांनी त्यांच्या वयाच्या 12व्या वर्षापासून चित्रकलेची सुरूवात केली आहे. मागील 15 वर्षांपासून त्या चित्रकला क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत आहेत. मनालीने एमबीए पदवी मिळवली आहे. राज्यसभाखासदार डॉ अनिल बोंडे यांच्या त्या कन्या आहेत.
कंबोडिया, लाओस, इटली, जर्मनी, इस्रायल, इंडोनेशिया अशा परदेशातील अनेक देशांना भेटी दिल्यानंतर मनालीने त्या- त्या देशाचे विचार आणि जीवनावर आधारित चित्रे या प्रदर्शनात ठेवली आहेत. भारताचे वैचारिक योगदान – वसुधैव कुटुंबकम यांनी या विचारसरणीचे आपल्या चित्र आणि प्रदर्शनातून कौतूक केले आहे. हे छायाचित्र प्रदर्शन 12 आणि 13 मार्च 2024 रोजी इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स, दिल्लीच्या दर्शना- 2 हॉलमध्ये सादर केले.