– पाच सुवर्ण पदकांसह एकूण ११ पदके
– डॉली पाटील आणि मयांक चाफेकरचे तिहेरी सुवर्णयश
पणजी :- मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राच्या क्रीडापटूनी पदकांची लयलूट करताना पाच सुवर्ण पदकांसह एकूण ११ पदके मिळवली. डॉली पाटील आणि मयांक चाफेकरचे तिहेरी सुवर्णयश हे वैशिष्ट्य ठरले.
डॉली पाटीलने महिला ट्रायथलेमध्ये २१ मिनिटे ०८.८३ सेकंदाची वेळ देत सोनेरी यश मिळवले. याच गटात मुग्धा वव्हाळ (२१ मिनिटे ०७.६०) कांस्य पदकाची मानकरी ठरली. मग डॉलीने मिश्र रिले प्रकारात मयांक चाफेकरच्या साथीने २० मिनिटे ४१.४३ सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्ण पदक मिळवले. त्यानंतर डॉलीने मुग्धा आणि श्रुती गोडसेच्या साथीने महिला सांघिक गटात सुवर्ण पदक प्राप्त केले.
मयांकने १८ मिनिटे १४.१७ सेकंद वेळेसह सुवर्ण पदक पटकावले, तर पार्थ मिरागेला रौप्य पदक मिळाले. तसेच मयांक, पार्थ आणि अंगड इंगळेकर या त्रिकूटाने पुरूषांचे सांघिक जेतेपद मिळवले.
लेझर रन महिला गटात योगिनी साळुंखेला रौप्य पदक मिळाले. योगिनीने मुग्धा आणि ज्योत्स्ना यांच्या साथीने सांघिक गटात रौप्य पदक संपादन केले. मिश्र गटात योगिनी आणि शहाजी सरगर जोडीने कांस्य पदक मिळवले.