नागपूर :- दक्षिण भारतातील तामिळनाडू मध्ये दलित शोषितांसाठी आत्मसन्मानाची चळवळ चालविणाऱ्या पेरियार ई व्ही रामास्वामी नायकर यांची 144 वी जयंती कही हम भूल न जाये या राष्ट्रीय अभियानांतर्गत बसपा तर्फे नागपूर शहर बसपा कार्यालयात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण नागपूर विधानसभेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील होते. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मा मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, युवा नेते चंद्रशेखर कांबळे, माजी नगरसेवक अजय डांगे, शहर प्रभारी विकास नारायणे यांनी मार्गदर्शन केले.
नारायण गुरु यांनी ईझवा जातीतील अस्पृश्यांसाठी चालवलेल्या वायकोम सत्याग्रहात पेरियार रामास्वामी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन आत्मसन्मानाची मुव्हमेंट उभी केली. त्यासाठी त्यांनी देव, धर्म, धर्मशास्त्र, ईश्वरावर कडाडून हल्ले चढवून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी बाबासाहेबांच्या आंदोलनाचे समर्थनही केले. त्यासाठी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन जस्टिस पार्टीची निर्मिती केली होती अशी माहिती या प्रसंगी बसपा नेते उत्तम शेवडे यांनी मार्गदर्शन करतांना दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दक्षिण नागपूर विधानसभेचे प्रभारी नितीन वंजारी यांनी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश भिवगडे यांनी तर समारोप दक्षिण नागपूर विधानसभेच्या उपाध्यक्षा वर्षा वाघमारे यांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीष शंभरकर, सौरभ गाणार, सचिन कुंभारे, सुमित जांभुळकर आदिंनी विशेष परिश्रम घेतले.