केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र नागपूर द्वारे मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

नागपूर :- भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या नागपूरच्या केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था -सीसीआरआय या संस्थेतर्फे तसेच मध्यप्रदेशच्या आगर माळवा आणि शाजापूर जिल्ह्यांतील कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 12 आणि 13 जुलै दरम्यान लिंबूवर्गीय फळांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कृषि आणि प्रक्रिया युक्त खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण(एपीडा) द्वारे प्रायोजित “मोसंबी उत्पादकांसाठी चांगल्या शेती पद्धतींचा अवलंब करण्यावर क्षमता विकास कार्यक्रम” या प्रकल्पा अंतर्गत या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना लिंबूवर्गीय लागवडीसाठी योग्य जमीन, रूटस्टॉक आणि लागवड साहित्य निवडण्याचे महत्त्व केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था -सीसीआरआयचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी यावेळी अधोरेखित केले. शेतकऱ्यांना लिंबूवर्गीय लागवडीसाठी वैज्ञानिक पद्धती आणि संस्थेने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करण्यासोबतच आगामी वाणांची माहितीही त्यांनी दिली.  शाजापूर आणि आगर माळवा हे मध्य प्रदेशातील लिंबूवर्गीय पिकांचे पट्टे आहेत परंतु दर्जेदार लागवड साहित्याची उपलब्धता नसणे हा या प्रदेशातील लिंबूवर्गीय लागवडीमध्ये मोठा अडथळा ठरत आहे. डॉ. घोष यांनी प्रगतीशील लिंबूवर्गीय उत्पादकांना पुढे येण्यासाठी, शेतकरी उत्पादक संघटना तयार करण्यासाठी आणि कंटेनरयुक्त रोपवाटिका तंत्रज्ञान शिकून रोपवाटिकका सुरू करण्यास आणि केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था -सीसीआरआय सोबत सामंजस्य करार करण्याचे आवाहन केले.

तांत्रिक सत्रांमध्ये, सीसीआरआयच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना लिंबूवर्गीय लागवडीच्या विविध महत्त्वाच्या पैलूंवर मार्गदर्शन केले. डॉ.आर.के. सोनकर यांनी लिंबूवर्गीय फळबागा स्थापना व व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, डॉ.ए.के. दास यांनी लिंबूवर्गीय रोग व्यवस्थापनाच्या पैलूंविषयी तपशीलवार माहिती दिली, डॉ. एन.एम. मेश्राम यांनी लिंबूवर्गीय पिकावर हल्ला करणार्‍या विविध कीटकांच्या नियंत्रणाच्या उपायांबद्दल शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले आणि डॉ. संगीता भट्टाचार्य यांनी शेतकर्‍यांना लिंबूवर्गीय पिकांमधील घट आणि संबंधित पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाबद्दल जागरूक केले. “नागपुरी संत्रा की उन्नत बागबानी” या विषयावरील माहिती पुस्तिका शेतकऱ्यांना यावेळी वितरित करण्यात आली.

पूनम कपूर, प्रादेशिक प्रमुख ,(एपीडा) , भोपाळ, यांनी कृषि आणि प्रक्रिया युक्त खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाच्या लिंबूवर्गीय निर्यातदारांसाठी योजनांची माहिती दिली. डॉ. ए.के. दीक्षित, (प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, आगर माळवा) आणि डॉ. जी.आर. अंबावतिया (प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, शाजापूर) यांनीही आपले मत व्यक्त केले. शास्त्रज्ञांच्या तज्ज्ञ चमूने शेतकऱ्यांच्या स्थानिक लिंबूवर्गीय बागांना प्रत्यक्ष भेटही या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कृषी विद्यापीठांना अधिक सक्षम करण्याच्या राज्यपालांच्या सूचना

Wed Jul 19 , 2023
मुंबई :- कृषी हा देशाच्या तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्याच्या कृषी विकासात कृषी विद्यापीठांचे योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे राज्यातील कृषी विद्यापीठांच्या विविध समस्यांचे निराकरण प्राधान्याने करून विद्यापीठांना अधिक सक्षम करण्याच्या सूचना राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज येथे दिल्या. राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक राजभवन येथे संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!