नागपूर :- बिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित केलेल्या नागपूर जिल्ह्यातील तब्बल 94 हजर 284 घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणतर्फ़े अभय योजना 2024 सुरु करण्यात आली असून यात ग्राहकांना वीजबिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण 61 कोटी 62 लाख रुपये माफ करण्यात येणार आहेत.
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ग्राहकांना कारवाईपासून दिलासा देण्यासाठी 1 सप्टेंबरपासून ही अभय योजना सुरु करण्यात आली असून या योजनेचा बिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित केलेल्या नागपूर परिमंडलातील ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी आवाहन केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. तथापि, थेट कायदेशीर कारवाई करण्याच्या ऐवजी सुविधा म्हणून ही सवलतीची योजना लागू केली असून या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन ग्राहकांनी चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
राज्यातील महावितरणच्या 31 मार्च 2024 पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. थकित बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही. योजनेचा कालावधी 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2024 आहे. या 94 हजार 284 ग्राहकांकडून महावितरणला मूळ बिलाची 187 कोटी 52 लाख रुपयांची रक्कम तसेच 2 कोटी 37 लाख रुपये व्याज आणि 59 कोटी 25 लाख रुपये विलंब आकार येणे आहे. तथापि, नागपूर जिल्ह्यातील या वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकित बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरुपातील 61 कोटी 62 लाख रुपये दंड माफ करण्यात येईल.
मूळ बिलाच्या 30 टक्के रक्कम भरून ऊर्वरित 70 टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळेल. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकित बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल. उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळेल
असा लाभ घ्या
संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाईल ॲपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीज ग्राहक 1912 किंवा 18002333435 किंवा 18002123435 या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल.