दावोस : स्वित्झर्लंड येथील दावोस मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५ हजार ९०० कोटींच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
मंत्री उदय सामंत म्हणाले, आज दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले असून त्यांनी दावोस येथे महाराष्ट्र पॅव्हेलियन’ला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार असून महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले असून या माध्यमातून सुमारे १० हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रेएरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते.
यावेळी करण्यात आलेल्या सामंजस्य करारानुसार ग्रीनको एनर्जी प्रोजेक्ट प्रा.लि.कंपनीची १२ हजार कोटींची, बेर्कशिरे हातवे होम सर्व्हीस ओरेन्डा इंडिया कंपनीची १६ हजार कोटींची, आयसीपी इन्व्हेस्टमेंट/ इंडस कॅपीटल कंपनीची १६ हजार कोटींची, रूखी फूड कंपनीची २५० कोटींची, निर्पो फार्मा पॅकेजींग इंडीया प्रा.लि. कंपनीची १६५० कोटींची याप्रमाणे याप्रमाणे गुंतवणूक अपेक्षित आहे.