नागपूर : राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय वसतिगृहातील मुलामुलींना ७ कोटी ५९ लाख रुपये निर्वाह भत्ता देण्यात आला आहे. उर्वरित निर्वाह भत्ता वाटपासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून लवकरच विद्यार्थ्यांना देण्यात येईल, अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य डॉ.मनिषा कायंदे यांनी शासकीय वसतिगृहातील समस्यांबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देतांना मंत्री राठोड बोलत होते.
मंत्री संजय राठोड पुढे म्हणाले, राज्यात मागासवर्गीय मुलामुलींचे ४४१ शासकीय वसतिगृहे असून मान्य विद्यार्थी संख्या ४३ हजार ३५८ इतकी आहे. या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा पुरविण्यात येतात. सोयीसुविधांबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने समाजकल्याण विभागाच्या पुरुष आणि महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वसतिगृहात मुक्कामी राहून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी “संवाद” उपक्रम राबविण्यात आला. या संवाद उपक्रमामध्ये काही वसतिगृहातील गृहपालांविरुद्ध अनेक बाबी निदर्शनास आल्या. अशा गृहपालांना कारणे दाखवा नोटाला बजावून दोषी आढळलेल्या २८ गृहपालांविरुद्ध चौकशीची कार्यवाही करण्यात येत आहे, असे मंत्री संजय राठोड यांनी उत्तरात सांगितले.
वसतिगृहामध्ये फर्निचर साहित्य पुरवठ्यासाठी ५९ कोटी
राज्यातील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहामध्ये आवश्यक सोयीसुविधा आणि साहित्य पुरविण्यासाठी समाज कल्याण आयुक्तालयाला ५९ कोटी ४३ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. यातून वसतिगृहात लोखंडी कॉट, ड्युअल डेस्क, साग टेबल, कपाट आदी फर्निचर साहित्य पुरवठा करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे, असे मंत्री संजय राठोड यांनी उपप्रश्नाला उत्तर देतांना स्पष्ट केले.
मागासवर्गीय वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठी सात कोटी वर्ग
राज्यातील ३१ शासकीय वसतिगृहांच्या इमारत दुरुस्तीसाठी एकूण ७ कोटी ५० लाख रुपये इतकी रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागास वर्ग करण्यात आली असून दुरुस्तीची कार्यवाही सुरु आहे, असेही संजय राठोड यांनी सांगितले.
वसतिगृहातील विनाप्रवेशित विद्यार्थ्यांबाबत चौकशी
शासकीय मागासवर्गीय वसतिगृहांमध्ये प्रवेश नसलेले आणि वर्षानुवर्षे वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांबाबत सदस्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. वसतिगृमध्ये विनाप्रवेशित विद्यार्थी राहत असल्यास याबाबत चौकशी करण्यात येईल. तसेच या विद्यार्थ्यांची इतरत्र राहण्याची सोय करण्याच्या सूचना देखील देण्यात येईल, असे मंत्री संजय राठोड यांनी उत्तरात सांगितले.
या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य महादेव जानकर, श्रीकांत भारतीय, आमश्या पाडवी, अभिजीत वंजारी आणि उमा खापरे यांनी सहभाग घेवून उपप्रश्न उपस्थित केले होते.