– सर्वाइकल कॅन्सर निशुल्क लसीकरण शिबिराला सदिच्छा भेट
नागपूर :- कर्करोग झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा कर्करोग होऊच नये याची काळजी घेण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे केले. श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींच्या शाळेत आयोजित सर्व्हायकल कॅन्सर निःशुल्क लसीकरण शिबिराला ना. नितीन गडकरी यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ व बालकला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने व अंकुर सिड्सच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी अंकुर सिड्सचे अध्यक्ष रवी काशीकर, अंकुर सिड्सचे प्रबंध संचालक माधवराव शेंबेकर, संचालक मकरंद सावजी व दिलीप रोडी, स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविंद्र फडणवीस, कोषाध्यक्ष प्रदीप मंडलेकर, भाजप वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. गिरीश चरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. नितीन गडकरी म्हणाले, ‘आपल्या देशात कर्करोगामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. यात महिलांचेही प्रमाण मोठे आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही अमेरिकेतून एक मशीन आणून त्याद्वारे चाचणी केली होती. तर त्यात २ हजार ५०० महिलांमध्ये कर्करोगाची लक्षणे आढळली. त्यानंतर लगेच त्यांच्यावर उपचार होऊन त्यांचा जीव वाचू शकला. आपल्या आसपास कर्करोग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आपली जीवनशैली देखील त्याला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शाळेतील शिक्षिकांनी हा विषय अधिक गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. उत्तम आरोग्याला प्राधान्य द्यावे. प्रकृती चांगली असेल तर जीवनाचा मनसोक्त आनंद घेता येईल.’ डॉ. गिरीश चरडे व डॉ. शिवांगी गर्ग यांच्या टीमच्या मदतीने १५० विद्यार्थिनींना लस देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध आष्टीकर यांनी केले.