नागपूर,दि. 24 :-केंद्र शासनाने सन 2021-22 या वर्षांपासून पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित नविन सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेस मंजुरी प्रदान केलेली आहे. सदर योजने अंतर्गत शेळी-मेंढी पालन, कुक्कुट पालन, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियानांतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनांकरिता 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अनुदानाची अधिकतम मर्यादा शेळी-मेंढी पालनाकरिता रु. 50 लक्ष अशी आहे. प्रकल्पाकरिता स्वहिस्सा व्यतिरिक्त उर्वरित आवश्यक निधी बँकेकडून कर्जाद्वारे उपलब्ध करून घ्यावयाचा आहे.
सदर योजनेचा लाभ व्यक्तिगत व्यावसायिक, स्वयं सहाय्यता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्या, सहकारी दूध उत्पादक संस्था, सहजोखीम गट(जेएलजी), सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्टअप ग्रुप इत्यादी घेऊ शकतात. सदर योजनांच्या लाभाकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा असून अर्जाचा नमुना व सर्व मार्गदर्शक सूचना महाराष्ट्राच्या संकेतस्थळ https://www.nlm.udyamimitra.in यावर उपलब्ध आहे.