संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून आज 23 जानेवरीला अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान कामठी-मौदा विधानसभा अंतर्गत येणाऱ्या कामठी तालुका, मौदा तालुका ,तसेच नागपूर ग्रामीण क्षेत्र मिळून 4 लक्ष 60 हजार 525 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती तहसीलदार अक्षय पोयाम यांनी दिली.
आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका लक्षात घेता शासनाच्या आदेशानुसार मतदार याद्यांचे पुनरीक्षण काम हाती घेण्यात आले होते. हे काम पूर्णत्वास गेले होते.प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आल्या होत्या.या मतदार याद्यामधून दुबार असलेले नाव वगळणे,मृतक मतदारांची नावे गाळणे,नवीन मतदारांचा समावेश करणे आदी उपक्रम राबविण्यात आले व आज 23 जानेवरीला अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली.त्यानुसार रामटेक लोकसभा मतदार संघात येणाऱ्या कामठी-मौदा विधानसभा मतदार संघात एकूण 499 बूथ अंतर्गत एकूण 4 लक्ष 60 हजार 525 मतदार आहेत ज्यामध्ये 2 लक्ष 32 हजार 795 पुरुष मतदार तर 2 लक्ष 27 हजार 713 स्त्री मतदार व 17 तृतीयपंथी मतदार आहेत.