३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा – जिम्नॅस्टिक्स, मॉडर्न पेंटॅथलॉनमुळे महाराष्ट्राची घोडदौड कायम!

– महाराष्ट्र अग्रस्थानावर

पणजी :- जिम्नॅस्टिक्स, मॉडर्न पेंटॅथलॉन क्रीडा प्रकारातील ‘पदकलुटी’च्या बळावर गोवा येथे सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी महाराष्ट्राने घोडदौड कायम राखताना पदकतालिकेत अग्रस्थान टिकवले आहे. जिम्नॅस्टिक्सपटूनी पाच सुवर्ण, चार रौप्य व तीन कांस्य अशी एकूण १२ पदकांची कमाई केली. तर मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राच्या क्रीडापटूनी पदकांची लयलूट करताना पाच सुवर्ण पदकांसह (३ रौप्य, ३ कांस्य) एकूण ११ पदके मिळवली. संयुक्ता काळेचे जिम्नॅस्टिक्समधील तसेच डॉली पाटील आणि मयांक चाफेकरचे मॉडर्न पेंटॅथलॉनमधील योगदान महत्त्वाचे ठरले. महाराष्ट्राने आज १४ सुवर्ण, १० रौप्य आणि ९ कांस्य अशी एकूण ३३ पदके मिळवली. आता महाराष्ट्राच्या खात्यावर २२ सुवर्ण, १८ रौप्य आणि २० कांस्य अशी एकूण ६० पदके जमा आहेत.

जिम्नॅस्टिक्स

*दिवसभरात १२ पदकांची कमाई; संयुक्ता काळेला दुहेरी सुवर्ण*

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जिम्नॅस्टिक्समध्ये वर्चस्व कायम राखताना शुक्रवारीही पदकांची लयलूट केली. महाराष्ट्राने पाच सुवर्ण, चार रौप्य व तीन कांस्य अशी एकूण १२ पदकांची कमाई केली. यात संयुक्ता काळेच्या दुहेरी सुवर्ण पदकांचा समावेश आहे.

महिलांच्या तालबद्ध जिम्नॅस्टिक्समधील बॉल रँकिंग प्रकारात संयुक्ता काळेने सुवर्णपदक जिंकताना २५.९५ गुण नोंदवले. तिची सहकारी किमया कार्लेने कांस्यपदक जिंकले. तिला २५.१५ गुण मिळाले. हरयाणाच्या लाइफ अडलाखाला रौप्य पदक मिळाले. याचप्रमाणे संयुक्ताने हूप प्रकारातही २६.२५ गुणांसह सोनेरी यश मिळवले. महाराष्ट्राचीच निशिका काळे (२३.४५ गुण) रौप्य पदकाची मानकरी ठरली. तर हरयाणाच्या लाइफ अडलाखाला कांस्य पदक मिळाले

ट्रॅम्पोलीनमध्ये पहिली दोन्ही पदके जिंकून महाराष्ट्राने शानदार कामगिरी केली. राही पाखळेने सुवर्णपदक जिंकताना ४३.८८ गुणांची नोंद केली तर सेजल जाधवने ४१.२० गुणांसह रौप्यपदक पटकावले. केरळच्या अन्विता सचिनला (४०.७० गुण) कांस्य पदक मिळाले.

एरोबिक्समधील मिश्र दुहेरीत अद्वैत वझे व राधा सोनी यांनी सुवर्णपदक मिळवले त्यांनी १६.३५ गुणांची नोंद केली. रौप्य पदक पश्चिम बंगालच्या अब्दुल चौधरी आणि सहिना यांनी तर कांस्य पदक गुजरातच्या निशांत चव्हाण आणि प्राकृती शिंदे यांनी पटकावले. सांघिक विभागातही महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळाले. त्यांनी १६.६० गुणांची कमाई केली.

एरोबिक्समधील ट्रायो प्रकारात आर्य शहा, स्मित शहा व उदय मढेकर यांनी रौप्य पदक जिंकले. त्यांना १७.१० गुण मिळाले. मणिपूरच्या संघाने सुवर्ण आणि सेनादलाने कांस्य पदक मिळवले.

आर्यने पुरुषांच्या वैयक्तिक विभागातही रुपेरी यश संपादन केले. त्याने १८.४५ गुणांची नोंद केली. महिलांच्या वैयक्तिक विभागात साक्षी डोंगरेला (१६.९५ गुण) कांस्य पदक मिळाले. अरीहा पांगमबाम (मणिपूर) आणि माजिदा खातून (पश्चिम बंगाल) यांना अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदके मिळाली.

महिलांच्या कलात्मक जिम्नॅस्टिक्समधील अनइव्हन बार प्रकारात महाराष्ट्राच्या श्रद्धा तळेकरने ९.५०० गुण मिळवत कांस्य पदक मिळवले. ओडीशाच्या प्रणती नायकला सुवर्णपदक मिळाले, तर बंगालच्या प्रणती दासला कांस्य पदक मिळाले. याचप्रमाणे टेबल व्हॉल्ट प्रकारात इशिता रेवाळेने ११.६५० गुण मिळवत कांस्य पदक प्राप्त केले. बंगालच्या स्वस्तिका गांगुलीलाही संयुक्तपणे कांस्य पदक मिळाले. ओडीशाच्या प्रणतीला सुवर्ण आणि त्रिपुराच्या प्रोतिष्ठा समंथाला कांस्य पदक मिळाले.

*मॉडर्न पेंटॅथलॉन*

*पाच सुवर्ण पदकांसह एकूण ११ पदके*

*डॉली पाटील आणि मयांक चाफेकरचे तिहेरी सुवर्णयश*

मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राच्या क्रीडापटूनी पदकांची लयलूट करताना पाच सुवर्ण पदकांसह (३ रौप्य, ३ कांस्य) एकूण ११ पदके मिळवली. डॉली पाटील आणि मयांक चाफेकरचे तिहेरी सुवर्णयश हे वैशिष्ट्य ठरले.

डॉली पाटीलने महिला ट्रायथलेमध्ये २१ मिनिटे ०८.८३ सेकंदाची वेळ देत सोनेरी यश मिळवले. याच गटात मुग्धा वव्हाळ (२१ मिनिटे ०७.६०) कांस्य पदकाची मानकरी ठरली. मग डॉलीने मिश्र रिले प्रकारात मयांक चाफेकरच्या साथीने २० मिनिटे ४१.४३ सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्ण पदक मिळवले. त्यानंतर डॉलीने मुग्धा आणि श्रुती गोडसेच्या साथीने महिला सांघिक गटात सुवर्ण पदक प्राप्त केले.

मयांकने १८ मिनिटे १४.१७ सेकंद वेळेसह सुवर्ण पदक पटकावले, तर पार्थ मिरागेला रौप्य पदक मिळाले. तसेच मयांक, पार्थ आणि अंगड इंगळेकर या त्रिकूटाने पुरूषांचे सांघिक जेतेपद मिळवले.

लेझर रन महिला गटात योगिनी साळुंखेला रौप्य पदक मिळाले. योगिनीने मुग्धा आणि ज्योत्स्ना यांच्या साथीने सांघिक गटात रौप्य पदक संपादन केले. मिश्र गटात योगिनी आणि शहाजी सरगर जोडीने कांस्य पदक मिळवले.

*वेटलिफ्टिंग*

*हर्षद वाडेकरच्या सुवर्णपदकासह तीन पदकांची कमाई*

वेटलिफ्टिंगमध्ये पदकांची लयलूट कायम राखत महाराष्ट्राने शुक्रवारी तीन पदकांची कमाई केली. यात हर्षद वाडेकरचे सुवर्ण, तृप्ती मानेचे रौप्य आणि अभिषेक निपाणेच्या कांस्य पदकाचा समावेश आहे.

वेटलिफ्टिंगमधील पुरुषांच्या ९६ किलो वजनी गटात हर्षद वाडेकरने स्नॅचमध्ये १४८ किलो तर क्लीन-जर्कमध्ये १८७ किलो असे एकूण ३३५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. सेनादलच्या जगदीश विश्वकर्माला (३३३ गुण) रौप्य पडकांवर समाधान मानावे लागले. हर्षद आणि जगदीश या दोघांनी स्नॅचमधील आपल्या अखेरच्या प्रयत्नात १५० किलो आणि क्लीन-जर्कमधील अखेरच्या प्रयत्नात १९० किलो वजन उचलण्याचे केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. ओडीशाच्या सुरेश यादवला (३२१ गुण) कांस्य पदक मिळाले.

अभिषेक निपाणेने ८१ किलो वजन गटात स्नॅचमध्ये १३६ किलो तर क्लीन-जर्कमध्ये १७३ किलो असे एकूण ३०९ किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले. राजस्थानच्या नतिक जांगिडने (३१७ किलो) सुवर्ण आणि मध्य प्रदेशच्या वल्लुरी बाबूने (३१२ किलो) कांस्य पदक मिळवले.

महिलांच्या ७१ किलो वजनी गटात तृप्ती माने हिने स्नॅचमध्ये ८७ किलो तर क्लीन-जर्कमध्ये १०३ किलो असे एकूण १९० किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले. पंजाबच्या हरजिंदर कौरने (२०१ किलो) रौप्य आणि माणिपूरच्या पोतशांगस्बाम देवीने (१८९ किलो) कांस्य पदक मिळवले.

*रग्बी*

*महाराष्ट्र संघ सलग दुसऱ्यांदा रौप्य पदक विजेता*

सुनील चव्हाणच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र रग्बी संघाने शुक्रवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्य पदकाचा बहुमान पटकावला. महाराष्ट्र पुरुष संघाला सलग दुसऱ्या वर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. हरयाणा संघाने १४-० अशा फरकाने महाराष्ट्रावर मात केली.

सुनील चव्हाण, प्रशांत आणि बबलू यादव यांच्या सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र रग्बी संघाने ही कामगिरी केली. महाराष्ट्र संघाने उपांत्य फेरीत ओडीशा संघाला पराभवाची धूळ चारली. महाराष्ट्र संघाने १९- १४ अशा फरकाने दणदणीत विजय संपादन केला. मुख्य प्रशिक्षक मीनल पास्ताला यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने रुपेरी यश मिळवले.

*तलवारबाजी*

*अभय, गिरीशला कांस्यपदके*

आंतरराष्ट्रीय तलवारबाज अभय शिंदे आणि गिरीश जकातेने शुक्रवारी महाराष्ट्र संघाला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत पदके मिळवून दिली. या दोघांनी तलवारबाजी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी वैयक्तिक कांस्यपदके कमावली. छत्रपती संभाजीनगरच्या अभयने सेंबर प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. तसेच गिरीश जकाते हा इप्पी प्रकारात कांस्यपदक विजेता ठरला.

*मल्लखांब*

*महाराष्ट्र महिला संघाला सुवर्ण*

गतविजेत्या महाराष्ट्र महिला मल्लखांब संघाने आपले वर्चस्व अबाधित ठेवत शुक्रवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

महाराष्ट्र संघाने रोप आणि पोलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत सर्वाधिक ८५.१५ गुणांची कमाई केली. महिला संघाने रोपमध्ये ४२.५५ आणि पोलमध्ये ४२.६० गुण मिळवले. रुपाली गंगावणे, जान्हवी जाधव, नेहा क्षीरसागर, पल्लवी शिंदे, निधी राणे आणि सायली शिंदे यांचा या संघात समावेश आहे. या गटात मध्य प्रदेश संघ रौप्य आणि तामिळनाडू संघ कांस्यपदक विजेता ठरला.

प्रशिक्षक प्रणाली जगताप, स्वप्नील शिंदे आणि व्यवस्थापक संजय केकान यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने मल्लखांबमध्ये सुवर्णपदकाचे खाते उघडले आहे.

—-

पेनकॅट सिलाट

दोन सुवर्ण पदके

महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पेनकॅट सिलाट क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदके मिळवली. पुरुषांच्या आर्टिस्टिक टंगल गटात कृष्णा पांचाळने सोनेरी यश मिळवले. महिलांच्या आर्टिस्टिक टंगल गटात किरनाक्षी येवलेने रौप्य पदक मिळवले. तसेच पुरुषांच्या आर्टिस्टिक रेगू सांघिक गटात महाराष्ट्राने सुवर्ण पदक मिळवले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मल्लखांबमध्ये महाराष्ट्र महिला संघाला सुवर्ण

Sat Oct 28 , 2023
पणजी :-गतविजेत्या महाराष्ट्र महिला मल्लखांब संघाने आपले वर्चस्व अबाधित ठेवत शुक्रवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्र संघाने रोप आणि पोलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत सर्वाधिक ८५.१५ गुणांची कमाई केली. महिला संघाने रोपमध्ये ४२.५५ आणि पोलमध्ये ४२.६० गुण मिळवले. रुपाली गंगावणे, जान्हवी जाधव, नेहा क्षीरसागर, पल्लवी शिंदे, निधी राणे आणि सायली शिंदे यांचा या संघात समावेश आहे. या गटात मध्य प्रदेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!