संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 27:-शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण मानल्या जाणाऱ्या बैल पोळा हा सर्वत्र साजरा करत असताना ऐन बैल पोळ्याच्या रात्रीला राष्ट्रीय महामार्ग क्र 7 वरील बायपास मार्गावरील नेरी गावातील गादा नेरी जुन्या मार्गावर 14 च्या जवळपास गोवंश जनावरे मृतावस्थेत आढळल्याची घटना घडल्याने गावात या घटनेची निंदनीय चर्चा व्यक्त करण्यात येत असून सदर घटनेसंदर्भात गावात भावनाशील नैराश्येचे वातावरण पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार या मार्गावरून दररोज गोवंश जनावरांची अवैध वाहतूक मोठया प्रमाणात होत असून या वाहतुकी दरम्यान गोवंश जनावरे हे निर्दयतेने कोंबून वाहतूक केली जाते.यासंदर्भात पोलिसांनी बरेचदा कारवाही सुद्धा केलेले आहेत.कामठी तालुक्यातील नेरी या गावामध्ये एकीकडे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सर्वांत मोठा सण बैलपोळा साजरा करण्यात आला तर दूसरीकडे त्याच गावातील शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात मृत गाई व बैलाचे मृतदेह आढळून आले. संपूर्ण शेतकरी बैलपोळामध्ये मग्न असताना अशाप्रकारची घटना घडल्याने गावातील शेतकऱ्यामध्ये निराशा आहे. या सर्व घटनेची जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांनी पाहणी केली. पोलीस प्रशासन व अधिकाऱ्यांचे भय बाजूला ठेवून अवैध जनावरांची तस्करी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे तेव्हा वेळीच या प्रकारच्या तस्करीदारांना आळा घालावा. प्रशासनानी या सर्व घटनेची तात्काळ दखल घ्यावी व दोषीवर कारवाई करावी. अन्यथा नागरीकाना सोबत घेऊन प्रशासनाविरुद्ध तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा जी प सदस्य दिनेश ढोले यांनी केला आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष वैरागडे व सह पोलीस कर्मचाऱ्यांसह पशुधन विस्तार अधिकारी डॉ लीना पाटील आदींनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाच्या पार्थिवावर जागीच शवविच्छेदन करून मृतदेह जमिनीत पुरवून अंत्यसंस्कार करण्यात आले.पोलिसांनी यासंदर्भात घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.