बारामती :- बारामतीत यंदा अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांविरोधात कोण उमेदवार असणार? याची राजकीय वर्तुळात कायमच चर्चा होत राहिली.
यंदा होणारी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राचं जनमत सांगणारी ठरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर आता पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे जनतेचा कौल कुणाला? हे सांगणारी ही निवडणूक आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवारांच्या बारामतीतही यंदा अटीतटीची लढत होणार आहे. अजित पवारांच्या विरोधात शरद पवार तगडा उमेदवार देणार आहेत. अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना शरद पवार उमेदवारी देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे बारामतीत आता निवडणुकीच्या रिंगणातही काका विरूद्ध पुतण्या संघर्ष पाहायला मिळणार आहे.