नागपूर – आजच्या युवा पिढीला योग्य शिक्षण मिळणे व तिला सशक्त करणे आवश्यक आहे त्यांना योग्य चारित्र्य देणे गरजेचे आहे पण त्याकरिता त्यांना स्वतः मधील योग्यतेची जाणीव होणे व सोबतच आपल्या देशाचा इतिहास समजणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक, कवी, समुपदेशक प्रेरक वक्ते, आणि व्यवस्थापन गुरू डॉ. मनोज साल्पेकर यांनी केले.
सेवासदन शिक्षण संस्था नागपूर च्या वतीने के. डॉ. वसंतराव वांकर व के डॉ. कुसुमताई वांकर पुरस्कृत द्विदिवसीय ३६ वी रमाबाई रानडे स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शनिवार दि.८ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ४ वाजता संस्थेचे श्रीमती माई मोतलग सभागृह सीताबर्डी नागपूर येथे आयोजित करण्यात आले.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मुकुंद ठाकुर संचालक विवेका हॉस्पिटल व झेनीत हॉस्पिटल, नागपूर तसेच संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कांचनताई गडकरी उपस्थित होत्या. व्याख्यानाचे दुसरे पुष्प गुंफतांना मा. डॉ. मनोज साल्पेकर यांनी ‘स्वाधीनता का अमृत महोत्सव’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले अनुशासन व शिस्त हा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे व आपल्या देशाचे सुरक्षादल याचे उत्तम उदाहरण आहे. आपल्या नवीन पिढीत समानुभूती, दया, करुणा हे भाव निर्माण व्हायला पाहिजे व त्याकरीता त्यांनी गौतम बुद्ध, राष्ट्रपिता महात्मा गांधी, मदर टेरेसा, सरदार वल्लभभाई पटेल यांचा आदर्श ठेवावा. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. मुकुंद ठाकुर यांनी यावेळी आपल्या भारत देशातील बुद्धी व मनुष्यबळाचा वापर आपल्या देशातच करून पुढील 25 वर्षात आपण आपल्या स्वप्नातील भारत साकारू शकतो असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप्रज्वलनाने झाली. प्राध्यापक चंद्रकांत गंपावर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, संस्था परिचय, पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राध्यापक श्रीमती अनघा दिक्षित यांनी वैयक्तिक गीत सादर केले तर संस्थेच्या आजीव सभासद मंडळाच्या कार्यवाह मा. श्रीमती वासंती भागवत यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम् ने झाली. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री बापूसाहेब भागवत, सहसचिव मा. श्री नानासाहेब आखरे, मा. श्रीमती वंदना मोहरील तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. कोविड १९च्या शासकीय नियमानुसार हा कार्यक्रम सेवासदन शिक्षण संस्था नागपूर च्या फेसबुकपेजवरून प्रक्षेपीत करण्यात आला.