संदीप कांबळे, कामठी
कागदोपत्री कामकाज दाखवून केली पैशाची उचल
सरपंच मंगला कारेमोरे व सचिव दोषी असल्याचा चौकशी समितीचा ठपका
कामठी ता. प्र २६ : दलितवस्तीमध्ये राहणाऱ्या अनुसूचित जाती आणि नवबौध्दांचा विकास व्हावा म्हणून शासन मोठया प्रमाणात निधी देत आहे. मात्र, हा निधीचा गैरवापर करून ठरावामध्ये दलितवस्तीसाठी निधी मिळवून घ्यायचा आणि तो निधी आला की, काम न करताच काम केल्याचे फक्त कागदोपत्री दाखवून पैसा लाटण्याचा व या निधीचा दुरूपयोग करून दलितवस्ती बकाल करण्याचे पाप कामठी तालुक्यातील येरखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगला कारेमोरे यांच्या हातून होत असल्याचे नागपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नेमून दिलेल्या त्री सदस्यीय समितीने केलेल्या चौकशीत आढळून आल्याने चौकशीअंती ठपका ठेवत सरपंच मंगला कारेमोरे व सचिव यांना सामायिक जबाबदार धरत दोषी ठरविण्यात आले आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.
कामठी तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी येरखेडा ग्रामपंचायत येथे सन २०१२ पासून विविध कामात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार नागपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्री सदस्यीय समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश दिले. या समितीमध्ये चौकशी समितीमध्ये चौकशी अधिकारी म्हणून मौदा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी) व विस्तार अधिकारी (पंचायत) यांचा समावेश होता. या समितीने ८ मार्च, १६ मार्च व २२ मार्च रोजी प्रत्यक्ष येरखेडा ग्रामपंचायत येथे ग्रामविकास अधिकारी जितेन्द्र डवरे, सरपंच मंगला मनीष कारेमोरे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तक्रारकर्ते व तत्कालीन १० ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत मोका चौकशी व दस्तावेजांची तपासणी करण्यात आली असता या चौकशीत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचे आढळून आले. त्यात आधीपासून पायाभूत सुविधा असलेल्या ठिकाणी दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत रस्ते व नाली बांधकाम न करता फक्त कागदोपत्री दाखवून पैशाची उचल केल्याचे आढळून आले. ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये जमाखर्च तसेच प्रोसेडींग बुक सादर न करता कोरे पेज सोडत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भोयर ले आऊट, साई प्रसाद ले आऊट, दुर्गा सोसायटी तसेच वार्ड क्रमांक २ मध्ये नाली बांधकाम केल्याचे अभिलेख चौकशी समितीला उपलब्ध करून दिले नसल्याने या बांधकामात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. खाजगी ले आऊटच्या खुल्या जागा ग्रामपंचायत ला हस्तांतरण करून घेण्यासाठी कोणतीही कार्यवाही न करता ती जागा ग्रामपंचायतीने विकल्याचा आरोपही त्यांच्यावर केला असता हस्तांतरण संबंधी कुठलीही कारवाई केली नसल्याने सरपंच मंगला कारेमोरे व सचिव यांना संयुक्तपणे दोषी ठरविण्यात आले. वृक्ष लागवड खर्च केल्याचे दाखविले परंतु वृक्ष लागवड कोठे केली याबाबत समितीला उत्तर देऊ शकले नाही. ग्रामपंचायत हद्दीतील टाटा हिट्याची शोरुम, हॉल, लॉन यांच्यावर कर आकारणी करण्यात दिरंगाई होत असल्याचा तसेच गोंडपुरा येथे अखिवपत्रीकेची मागणी न करता बोगस लाभार्थ्याला घरकुल योजनेचा लाभ दिल्याचा ठपका ठेवण्यात आला. या त्रिसदस्यीय पथकाने विविध योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांची पाहणी केली. यात त्यांनी बहुतांष ठिकाणचे नमुनेही गोळा केले होते त्यामुळे दलित वस्तीच्या निधी वापरात गैरप्रकार झाला असल्याचे निदर्षनास आले. या त्रिसदस्यीय पथकाने विविध योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांची पाहणी केली. यात त्यांनी बहुतांष ठिकाणचे नमुनेही गोळा केले होते त्यामुळे दलित वस्तीच्या निधी वापरात गैरप्रकार झाला असल्याचे त्री सदस्यीय समितीने केलेल्या चौकशीत आढळून आल्याने चौकशीअंती ठपका ठेवत सरपंच व सचिव यांना सामायिक जबाबदार धरत दोषी ठरविण्यात आले आहे. त्यामुळे कामठी तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी येरखेडा ग्रामपंचायत येथे २०१२ पासून विविध कामात होत असलेला भ्रष्टाचार उघड झाल्याने जिल्हा प्रशासन सरपंच मंगला कारेमोरे यांच्यावर कोणती कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून या प्रकारामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.