नागपूर :- महावितरणच्या सुधारीत वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) आणि वीज यंत्रणा विकास निधी (एपीएफ़सी) अंतर्गत नागपूर परिमंडलात वीज यंत्रणा विस्तारीकरण आणि सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली कामे ही दिलेल्या माइलस्टोननुसारच पूर्ण करण्यात यावेत. शिवाय महावितरणने निश्चित केलेल्या साहित्याच्या आणि कामाच्या गुणवत्तेनुसारच काम करण्याचे निर्देश संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी दिले.
विद्युत भवन, नागपूर येथे प्रसाद रेशमे यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी संचालक (प्रकल्प) यांनी वाहिनी विलगीकरण, उपरी वाहीन्यांचे भूमिगत वीज वाहिन्यांमध्ये स्थलांतरण आणि कॅपेसिटर बँके बसविण्याच्या कामांचा विस्तृत आढावा घेतला. या बैठकीला नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंते अमित परांजपे, राजेश नाईक आणि अजय खोब्रागडे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, समीर शेंद्रे, दिपाली माडेलवार आदी उपस्थित होते. यावेळी संचालक (प्रकल्प) रेशमे यांनी नागपूर परिमंडलात सुरू असलेल्या सर्व प्रकल्पाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. नागपूर ग्रामीण मंडलातील काटोल, मौदा, उमरेड आणि सावनेर या 4 विभागांमध्ये एकूण 160 वाहिन्यांचे विलगीकरणासाठी करण्यात येणार असून यापैकी बहुतांश कामांना सुरुवात झाली आहे. वाहिनी विलगीकरणामुळे या वाहिन्यांवरील ग्राहकांच्या वीजपुरवठ्याच्या दर्जा अधिक सुधारणार आहे. याचसोबत 11 केव्ही उपरी व भूमिगत वाहिनी, उच्चदाब एरियल बंच कंडक्टर, स्पेशल डिझाईन ट्रान्सफ़ॉर्मर, वितरण रोहित्रे, लघुदाब उपरी वाहिनी यासह होणा-या इतर कामांचा देखील प्रसाद रेशमे यांनी आढावा घेतला.
कॅपेसिटर बँकेची पाहणी
संचालक (प्रकल्प) यांनी बैठकीपश्चात 1.2 एमव्हीए क्षमतेच्या कॅपेसिटर बँकेच्या पाहणीसाठी सावनेर विभागातील 33 केव्ही खापा उपकेंद्राला भेट दिली. नागपूर परिमंडलात खापा उपकेंद्रासोबतच पारशिवनी उपकेंद्र आणि वर्धा मंडल अंतर्गत आर्वी उपविभागातील सावळी, हेटीकुंडी, अंतोरा आणि विजयगोपाल उपकेंद्रात प्रत्येकी 1.2 एमव्हीएआर क्षमतेच्या कॅपेसिटर बँक बसविण्यात आल्या असून यामुळे या परिसरातील कृषी ग्राहकांना योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळत आहे. याचसोबत नागपूर जिल्ह्यातील गुमथळा, पाचगाव, बाजारगाव, कोंढाळी, भारसिंगी, मसोद, वडविहारा, पवनी, चिरवा, कुही आणि वर्धा जिल्ह्यातील विरुळ येथे कॅपेसिटर बँक बसविण्याचे काम सुरु आहे. यावेळी प्रसाद रेशमे यांनी आणि रिऍक्टिव्ह पॉवर मॅनेजमेंट अंतर्गत वीज यंत्रणा विकास निधी योजनेतील प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला.
– उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नगपूर