गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग – लक्षणे, कारणे आणि उपचाराबाबत मार्गदर्शन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पीटलतर्फे मनपात जनजागृती कार्यशाळा
नागपूर : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे गर्भाशयाच्या किंवा ग्रीवाच्या सर्वात खालच्या भागात घातक पेशींच्या वाढीचा संदर्भ आहे जो योनिमार्गाशी जोडला जातो. स्तन, कोलोरेक्टल आणि एंडोमेट्रियल कर्करोगानंतर महिलांमध्ये आढळणाऱ्या सर्वात सामान्य कर्करोगांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग चौथ्या क्रमांकावर आहे. भारतात १ लाख महिलांमागे १७ टक्के महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग आढळतो. परंतू, महिला तपासणीसाठी पुढे येत नसल्याने उपचारात अडचणी येत असल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पीटलच्या स्रीरोगतज्ज्ञ डॉ. माधुरी गांवडे यांनी दिली.
जानेवारी महिना हा गर्भाशय मुखाचा कर्करोग जनजागृती महिना म्हणून पाळला जातो. या अनुशंगाने गुरूवारी (ता. ५) रोजी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पीटलच्या पुढाकाराने नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे सर्व आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्याकरीता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पीटलचे संचालक डॉ. करतार सिंग, स्त्रीरोगतज्ज्ञ माधुरी गांवडे, वैद्यकीय समन्वयक डॉ. राहुल ठाकरे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. यावेळी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग लक्षणे, कारणे आणि उपचार यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गांवडे यांनी सांगीतले की, जानेवारी महिन्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यात येते. यानिमित्ताने नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पीटल येथे गर्भाशय मुखाच्या कर्करोगासंदर्भातील महत्वपूर्ण असलेली पॅप टेस्ट मोफत करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ९ ते २५ वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरणही रुग्णालयात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगीतले. या कर्करोगाबाबत महिलांमध्ये जागृतीचा अभाव असल्याने, कर्करोग गंभीर स्वरूप घेत आहे. महिलांनी आपल्या आरोग्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन, वेळोवेळी तपासणी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्य़शाळेत युपीएचसीमधील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेचे संचालन आरोग्य व एनयूएचएम समन्वयक दीपाली नागरे यांनी केले. अतिरीक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांनी आभार मानले.