मुंबई :- सध्या राज्यसभा निवडणुकीची चर्चा आहे. 15 राज्यातील राज्यसभेच्या 56 जागा रिक्त होणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील 6 खासदार आहेत. या रिक्त होणाऱ्या राज्यसभांच्या जागांवर महाराष्ट्रातून कोणाला पाठवणार? या विषयी उत्सुक्ता आहे. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली. हे तिन्ही नेते महायुती सरकारमध्ये आहेत. महायुती सर्वच्या सर्व 6 जागा लढवू शकते. त्यात भाजपाच्या वाट्याला तीन जागा आहेत. पण भाजपा चौथा उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वाट्याला एक जागा येईल. सध्याच पक्षीय बलाबल पाहता महाविकास आघाडीला एकही जागा मिळण्याची शक्यता वाटत नाहीय. काँग्रेसकडे 1 जागा आहे, पण ही जागा लढवताना मतांची फाटाफूट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाने चौथा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्यास निवडणूक चुरशीची होईल.
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा निवासस्थानी झालेली बैठक आणि राज्यसभा निवडणुकीबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारले. “महायुतीचे किती उमेदवार अर्ज भरणार ते उद्या तुम्हाला समजेलच. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणी किती जागा लढवायच्या? प्रचार सभा कुठे होणार? या विषयी चर्चा झाली” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. 15 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.