राजकीय फायद्यासाठी वैचारिक तडजोड बहुजनांना मान्य नाही – अँड.संदीप ताजने

शिवसेना-वंबआ युती केवळ दोन नातवंडांपूर्तीच

नागपूर :- राज्यातील राजकारणात नव्याने उदयाला आलेल्या शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीचा बहुजन समाजावर कुठलाही प्रभाव पडणार नाही.महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरेंचे नातू यांच्यात विद्यमान राजकीय स्थितीमुळे झालेली ही युती आहे.वैचारिक आंदोलनाला या युतीत कुठेही स्थान नाही,असे स्पष्ट मत बहुजन समाज पार्टी चे अध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी बुधवारी व्यक्त केले.

२०१९ पूर्वी भारिप बहुजन महासंघाचे राज्यात काय अस्तित्व होते, हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे.अशात शिवसेना सोबत प्रकाश आंबेडकरांचा घरोबा आंबेडकरी समाजाला रुचणार नाही.आंबेडकरी विचारधारा हिंदुत्ववादी विचारधारेची कट्टर विरोधक आहे. या वैचारिक संघर्षाचा इतिहास जुना आहे.त्यामुळे या वैचारिकतेसोबत केवळ राजकीय फायद्यासाठी तडजोड करण्याच्या निर्णयाचा आंबेडकरी समाजावर प्रभाव पडणार नाही, असे अँड.ताजने म्हणाले.

पक्षातील बंडानंतर एकाकी पडलेले उद्धव ठाकरे आपले राजकीय अस्ति​त्व टिकवण्यासाठी ‘भीमशक्ती’चा आधार घेत आहे.यापूर्वी ज्यांनी बहुजनांची हेटाळणी केली, ज्यांनी महामानवाचे नाव विद्यापीठाला देण्याला विरोध करीत आमच्या घरातील ‘पीठ’ काढलं, त्यांच्या सोबत प्रकाश आंबेडकरांनी जाण्याचा निर्णय दुर्दैवी आहे.बाबासाहेबांचा वारसा चालवण्याचे काम करीत बहुजनांना शासनकर्ती जमात बनवण्याचे काम मान्यवर कांशीराम आणि त्याच्या नंतर मायावती यांनी खऱ्या अर्थाने केले आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील बहुजन चळवळ, आंबेडकरी समाज यापूर्वी, आज आणि भविष्यात ही बसपा च्या पाठीशी खंबीरपणे उभी होती, आहे आणि राहील,असा दावा अँड.ताजने यांनी केला.

ज्यांना आपला पक्ष सांभाळता आला नाही, ज्यांच्या नेतृत्वावर असंख्य प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहेत, अशा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणे कितपत योग्य आहे, याचा देखील विचार आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी केला पाहिजे. महाराष्ट्रात साठोत्तर काळापासून बाळासाहेब ठाकरे विरुद्ध दलित किंवा नवबौद्ध किंवा शिवसेना विरुद्ध दलित पँथर वा आंबेडकरी संघटना,असा थेट राजकीय-सामाजिक संघर्ष झडत राहिला आहे. हा संघर्ष वैचारिकही आहे.आरक्षण, नामांतर, हिंदुत्व अशा प्रत्येक मुद्दय़ावर हा संघर्ष झडत गेला, परंतु आता केवळ राजकीय फायद्यासाठी युतीचा निर्णय दुर्दैवीच आहे, असे अँड.ताजने म्हणाले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com