नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या श्रेणीवर्धनासाठी दशकापूर्वी पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेंतर्ग दिलेले दीड कोटी रुपये इतरत्र खर्च करण्यात आल्याने या रुग्णालयाच्या ए विंगेच बांधकाम अनेक वर्षांपासून अर्धवट पडून आहे
नागपुरात एम्सची घोषणा झाल्यानंतर मेडिकल परिसरात एम्सची तात्पुरती सोय करण्यासाठी या निधीचा वापर केला. हा निधी नियमबाह्य प्रकारे वापरल्यामुळे दशकानंतरही सुपरच्या ए विंगचे बांधकाम सुरू झाले नाही, अशी माहिती उजेडात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) १० वर्षापूर्वी पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेतून दीडशे कोटीचा निधी मेडिकल, सुपरच्या श्रेणीवर्धनासाठी मंजूर करण्यात आला होता. या योजनेतून सहा कोटी ७२ लाखांचा निधी ‘ए विंग’च्या बांधकामासाठी होता. सुरुवातीची साडेचार ते पाच वर्षे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले होते. यामुळे बांधकाम सुरू झाले नाही. उशीर झाल्याने सुपरच्या ‘ए विंग’च्या बांधकामाचा खर्च वाढला होता. जून २०१६ मध्ये सुपरच्या ए विंगच्या बांधकामाला नव्याने राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. या बांधकामावर १८ कोटी खर्च केला जाणार होता.
पंतप्रधान आरोग्य योजनेतूनच मेडिकलमध्ये ‘ट्रॉमा केअर युनिट’ तयार झाले. ट्रॉमाचा सुरवातीचा खर्च ११ कोटी ६० लाख मंजूर झाला होता. परंतु बांधकाम करताना दुप्पट अर्थात २५ कोटीवर खर्च झाला असल्याची माहिती आहे. मेडिकलसोबतच सुपरमध्ये ‘ए विंग’चे बांधकाम मात्र बरेच वर्ष रखडले. यानंतर काही प्रमाणात बांधकाम झाले, मात्र त्या दरम्यान नागपुरात एम्सची उभारणी होत असताना मेडिकलमध्ये एम्सचे वर्ग सुरू झाले. एम्सच्या संचालक कार्यालयापासून तर विद्यार्थ्यांच्या वर्गासाठी प्रयोगशाळेसह इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे ३ कोटींचा खर्च मेडिकलने केला. हा खर्च करताना मात्र सुपरच्या ए विंगच्या बांधकामाचा निधी एम्सचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी वळता केला. यामुळे ‘ए विंग’चे बांधकाम रखडले. सध्या अर्धवट बांधकाम असून येणाऱ्या काळात हे बांधकाम कधी होईल, हे सध्यातरी सांगता येत नाही.