नागपूर :- खरीप हंगामामध्ये सोयाबिन पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेवून शेतकऱ्यांनी सोयाबिन बियाणे खरेदी करताना उगवन क्षमता लक्षात घेवूनच बियाण्यांची खरेदी करावी असे आवाहन कृषीविभागातर्फे करण्यात आले आहे.
पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता वाढविण्यासाठी चाळणी करावी. कागद घेवून त्याला चार घड्या पाडाव्यात यामुळे कागदांची जाडी वाढेल. नंतर तो कागद पाण्याने ओला करावा व प्रत्येकी 10 बिया घेवून उगवन क्षमता तपासावी. अशा रितीने 100 बियांच्या 10 गुंडाळया पॉलिथीन पिशवी चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसांनंतर त्या हळूहळू उघडून पाहून त्यामध्ये बिजाकंकृत झालेल्या बिया मोजाव्यात. जर अंकुरीत झालेल्या बियांची संख्या 80 असेल तर उगवण क्षमता 80 टक्के समजावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
रायाझोबियम व पी.एस.बी. या जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास प्रत्यक्ष पेरणीची 3 तास अगोदर बीज प्रक्रिया करुन असे प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे. पेरणीपूर्वी प्रतीकिलो बियाण्यास, 3 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीज प्रक्रिया करावी, 75 ते 100 मि.मि. पर्जन्यमान झाल्यावरच सोयाबीनची पेरणी करावी. बियाण्यांची पेरणी 3 ते 4 से.मी. खोली पर्यंत करावी . पेरणीपुर्वी प्रति हेक्टर दर 70 किलो वरुन 50 ते 55 किलो आणण्यासाठी सोयाबीन बियाणे टोकन पध्दतीने किंवा प्लॉन्टरच्या सहाय्याने रुंद वरंबा सरी पध्दत (बी बी एफ) यंत्रानेसुध्दा पेरणी करावी .
बियाणे विक्रेत्याकडून बियाणे खरेदी करताना पावती घेणे आवश्यक आहे. पावतीवर बियाणे उत्पादक कंपनीचे पूर्ण नाव, वाण, लॉट क्र. तपशील आवश्यक आहे. बियाणे पिशवी व लेबल, खरेदी पावती, पिक काढणी होईपर्यंत जपून ठेवावी असे कृषी सहसंचालकांनी कळविले आहे.