– निळ्या आसमंतातील आम्ही पाखरे-सम्यक थिएटर प्रस्तुत
नागपूर :-मागील ६० वर्षांपासून उत्तर नागपूरातील सामान्य नागरीक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंत ज्याच्या प्रतिक्षेत होते, अशा सर्व सोईयुक्त वातानुकुलीत सभागृह म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर इन्टरनॅशनल कन्व्हेक्शन सेन्टर, कामठी रोड, नागपूर यांचे लोकार्पण दि.१४ एप्रिल २०२३ रोजी, केंद्रीयमंत्री नितिन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस यांचे हस्ते झाले होते. परंतु त्याचा वापर अद्यापपर्यन्त सुरु झाला नसल्यामुळे उत्तर नागपुरातील जबाबदार व जागृत ज्येष्ठ नागरिक म्हणजेच नार्थ नागपूर सिनियर सिटीझन फोरम व युवा ग्रॅज्युएट फोरम यांनी भव्य दिव्य असे निदर्शने व आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने दखल घेवून कन्व्हेक्शन सेन्टर सुरु केले असून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याचा पहिला मान नागपूरातील मागील २४ वर्षांपासून सतत प्रबोधन करीत असलेली संस्था म्हणजेच सम्यक थिएटर नागपूर यांना मिळाला आहे.
सम्यक थिएटर नागपूर निर्मित “निळ्या आसमंतातील आम्ही पाखरे” या संगीतमय बालमहोत्सव दि.२३ जुलै रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सोशल मिडियावर सुपरिचीत असलेली व अत्यंत कमी वयात आपल्या वक्तृत्वाने सर्वांचे मन जिंकणारी चिमुकली वक्तृत्वपटु सानू भाऊराव घोनमोडे, जवाहर नवोदय विद्यालय भंडारा येथील वर्ग ७ ची विद्यार्थीनी असून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सिद्धार्थ गायकवाड उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर तसेच सुकेशिनी तेलगोटे, सहा.आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, नागपूर यांच्या उपस्थितीत १० वी व १२ वी तसेच पदवीधर गुणवंताच कौतुक व मुलांच्या आरोग्य विषयक महत्त्वाची माहिती सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ. साकेत अनिल गेडाम तसेच दंत चिकीत्सक डॉ.आशिष मोतीलाल नाईक व मानसोपचार तज्ञ डॉ.अपूर्वा हार्दिक साखरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच बालमित्रांचा संगीतमय नृत्य व गायनाचा नजराणा छाया वानखेडे व वैशाली गोस्वामी यांच्या मार्गदर्शनात होणार आहे.
करीता समस्त नागरिकांना विनंती आहे की, आपण या कार्यक्रमाला आर्वजून उपस्थित राहून उत्तर नागपूरातील जनतेकरीता तयार केलेल्या कन्व्हेक्शन सेन्टरचा लाभ घ्यावा. असे आवाहन सम्यक थिएटर चे संयोजक नरेश साखरे, प्रमोद कुमार, इंजि. सुरेश खोब्रागडे व एल.एस. जवादे यांनी केले असून नार्थ नागपूर सिनियर सिटीझन फोरम व युवा ग्रॅज्युएट फोरम यांनी सुद्धा सदर कार्यक्रमाचा व या भव्य दिव्य अशा वास्तुचा लाभ घ्यावा अशी विनंती केली आहे.