– स्पर्धेच्या माध्यमातुन झाली २११२ वृक्षांची लागवड
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १ जुलै ते १५ जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या आम्ही वृक्षप्रेमी स्पर्धेत एकुण २११२ वृक्षांची लागवड करण्यात आली असुन स्वयंसेवी संस्था गटात अथर्व कॉलोनी ओपन स्पेस संस्थेने प्रथम प्रथम तर खुल्या गटात चंद्रपूर बचाओ संघर्ष समिती गटाने प्रथम बक्षीस प्राप्त केले आहे.
६ ऑगस्ट रोजी मनपा सभागृहात आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल व उपायुक्त रवींद्र भेलावे यांच्या हस्ते फेसबुक लाईव्हद्वारे झालेल्या कार्यक्रमात विजेत्यांची घोषणा करण्यात आली. आर्ट व क्राफ्ट शिक्षक नंदराज जीवनकर, प्रोफेसर वंदना गोलछा, इंटिरियर डिझाइनर ऋचा ठाकरे, माजी वनाधिकारी अशोक बडकेलवार, रेंज फॉरेस्ट ऑफीसर यादव बी येलमुले, माजी उपप्राचार्य अरुण रहांगडाले या त्रयस्थ परीक्षकांमार्फत स्पर्धेचे निरीक्षण करण्यात येऊन खुल्या गटात चंद्रपूर बचाव संघर्ष समितीस २१ हजार रुपयांचे प्रथम,जेष्ठ नागरिक संघास १५ हजार रुपयांचे द्वितीय, श्री धनलक्ष्मी बचत गटास ११ हजार रुपयांचे तृतीय तर श्री स्वामी समर्थ शिवनेरी उद्यान,योगा नृत्य रामाला तलाव,ग्रीन पॉट ग्रुप,योग नृत्य परिवार संजय नगर,गजानन महाराज मंदीर उद्यान या ५ गटांना ५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
स्वयंसेवी संस्था गटात अथर्व कॉलोनी ओपन स्पेस संस्थेस २१ हजार रुपयांचे प्रथम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संघास १५ हजार रुपयांचे द्वितीय, ओपन स्पेस, राष्ट्रवादी नगर संघास ११ हजार रुपयांचे तृतीय तर, चंद्रपूर चव्हान कॉलनी सोसायटी, विश्व कन्यका आर्य वैश्य समाज बहुउद्देशीय संस्था रामनगर हर्षिनी बहुउद्देशीय संस्था रामनगर व चंद्रपूर वाघोबा बहुउद्देशीय सामाजिक संस्था या ५ संस्थांना ५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत झालेल्या या स्पर्धेत स्थानिक सामाजिक संस्था, एन.जी.ओ, ओपन स्पेस विकास समिती, विविध क्लब, जेष्ठ नागरिक मंडळे, युवक-युवती मंडळे तसेच महिला मंडळे यांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धा अधिकृत सामाजिक संस्था / नोंदणीकृत क्लब व नागरिकांसाठी खुला गट अश्या २ गटात घेतली गेली होती. यात स्वयंसेवी संस्थांचे १४ गट तर नागरिकांचे ३३ गट असे एकुण ४७ गट सहभागी झाले होते.
स्पर्धेअंतर्गत नागरीकांद्वारे वृक्षारोपणाच्या दृष्टीने विशेष कार्य करण्यात आले, यात सगळ्याच सहभागी संस्थांनी शहरात अनेक जागी रॅली काढुन वृक्ष लावणे व त्यांचे संगोपन करणे याबाबत जनजागृती केली.काही संस्थांनी एकाच प्रकारची वृक्षे ओळीने लावुन वृक्षसंगती केली. सहभागी नागरीकांनी विविध चौकात बसण्याच्या जागेशेजारी वृक्ष लावले जेणेकरून झाडे मोठी झाल्यावर त्यांची सावली आपसूकच मिळेल.चंद्रपूर बचाव संघर्ष समितीने टाकाऊ वस्तुंपासुन ट्री गार्ड बनविले,श्री धनलक्ष्मी बचत गटाने एक मुलगी एक झाड उपक्रम राबविला त्याचप्रमाणे एकाच ठिकाणी विविध प्रजातीचे ५ वृक्ष लाऊन पंचवटी तयार करणे,राशी नुसार नक्षत्रवन तयार करणे इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले व सहभागी नागरिकांनी १०० हुन अधिक वृक्ष संगोपन करण्याच्या दृष्टीने दत्तक घेतले