‘वैनगंगा ते नळगंगा नदी जोड प्रकल्प’ कालबद्ध वेळेत पूर्ण करणार  – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : विदर्भातील ‘वैनगंगा ते नळगंगा महत्त्वाचा नदी जोड प्रकल्प’ असून याबाबतचे जवळपास सर्व आराखडे तयार करण्यात आले आहेत. यासाठी 426 किमी चा बोगदा तयार करण्यात येत असून राज्यातील हा सर्वात मोठा हा बोगदा असेल. या प्रकल्पासाठी निधी उभारण्याबाबत योजना तयार करण्यात येत आहे. विदर्भाचे भाग्य बदलणारा हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत निश्चित वेळेत पूर्ण करणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

विदर्भातील वैनगंगा ते नळगंगा या एकमेव नदी जोड प्रकल्पाचा नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सीकडून प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असल्याबाबत लक्षवेधी सूचना श्रीमती श्वेता महाले यांनी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकल्पाबाबत राज्यस्तरीय समितीची मान्यता घेऊन मान्यता घेऊन निविदा काढण्यात येईल. हा प्रकल्प संपूर्ण विदर्भासाठी नवसंजीवनी देणारा ठरेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यासाठी पाच लाख 72 हजार हेक्टर जमीन संपादित केली आहे. यासाठी सुधारित आराखडा तयार केला असून यासाठी महाराष्ट्र शासन 82 हजार कोटी खर्च करेल. या प्रकल्पामुळे विदर्भातील दुष्काळी भागातील प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकल्पात वाशीम जिल्ह्याचा समावेश केला आहे. हा प्रकल्प पुढे परभणी, हिंगोली पर्यंत नेण्यासाठी रचना करण्यात आली आहे. हे पाणी ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून नेऊन दुष्काळी भागासाठी वरदान ठरणार आहे.

या आराखड्यात बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यावर कुठलाही अन्याय होणार नाही. बुलढाण्यातून वाशिमला पाणी जाऊ शकेल या दृष्टीने प्रयत्न केले जातील. यासाठी सर्व जागा अधिग्रहित करून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सदस्य सर्वश्री हरीश पिंपळे, दादाराव केचे, राजेंद्र शिंगणे यांनी या लक्षवेधी सुचनेवरील चर्चेत सहभाग घेतला होता.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com