मतदारांनो, ६ एप्रिलला कस्तुरचंद पार्कवर नक्की या !- जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आवाहन

– मतदार जनजागृतीसाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी स्विप अंतर्गत विशेष भर देण्यात येत आहे. नागपूर आणि रामटेक मतदार संघात मतदानाचे प्रमाण हे मतदारांनी मतदान केल्याशिवाय वाढणार नाही. राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून मतदारांनी पुढे यावे यादृष्टीने समाजातील प्रत्येक घटकाशी आम्ही संवाद साधत आहोत. मतदान करण्याचा संदेश जनमानसात रुजावा यादृष्टीने येत्या 6 एप्रिल रोजी कस्तुरचंद पार्कवर भव्य मतदार साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रामटेक लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार उपस्थित होते.

गेल्या लोकसभा निवडणुकीतील जिल्ह्यातील मतदानाचे कमी प्रमाण लक्षात घेता यंदा मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पद्धतशीर मतदारांचे शिक्षण आणि निवडणूक सहभाग अर्थात स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. एकाच जागेवर सुमारे 7 हजार 500 मतदारांचे निवडणूक साक्षरता प्रशिक्षण यशस्वी करण्याचा आमचा मानस आहे. एकप्रकारे हा वेगळा विक्रम ठरेल. याचबरोबर सोशल माध्यमांद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन गाण्याद्वारे स्थानिक पातळीवरच चित्रित केले असून याचेही विमोचन येत्या 6 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता कस्तुरचंद पार्कवर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मतदारांना मतदानाचे महत्व, मतदान केंद्र कसे शोधावे, मतदान यंत्राची माहिती, भारत निवडणूक आयोगाच्या मतदारांसाठी उपयुक्त अशा विविध ॲप्सची माहिती, नोटा म्हणजे काय, मतदानाची प्रतिज्ञा अशी वैविध्यपूर्ण मतदानाशी संबंधित माहिती या कार्यक्रमादरम्यान दिली जाणार आहे. शहरातील मोठी मतदारसंख्या असलेल्या इमारतींमधील मतदानाची टक्केवारी लक्षात घेता या इमारतींवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. या इमारतींमधील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी इटनकर म्हणाले.

*रामटेकच्या आदिवासीबहुल भागावर विशेष लक्ष*

जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वच स्तरातील घटकांचा सहभाग महत्वपूर्ण आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील आदिवासीबहुल भागावर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. यासाठी विशेष जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

*पुरेशा मनुष्यबळासह पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण*

नागपूर आणि लोकसभा मतदारसंघातील मतदानासाठी सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचा-यांचे पुरेशे मनुष्यबळ उपलब्ध आहे. मतदान केंद्राध्यक्ष 5 हजार 412, प्रथम मतदान अधिकारी 10 हजार 824 तसेच इतर मतदान अधिकारी 5 हजार 412 असा एकूण 21 हजार 648 अधिकारी व कर्मचा-यांचे पुरेशे मनुष्यबळ उपलब्ध आहे. सर्वांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. या प्रशिक्षणादरम्यान विविध फॅार्मसची माहिती देण्यात आली. तर दुस-या टप्प्यातील प्रशिक्षण हे 9 आणि 10 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणादरम्यान सर्व शंका आणि प्रश्नांचे निरसन करीत अद्ययावत माहिती देण्यात आली असल्याचे इटनकर यावेळी म्हणाले.

*‘सी व्हिजिल ॲप’वरील 24 तक्रारींचे निरसन*

रामटेक आणि नागपूर लोकसभा मतदारसंघातील सी व्हिजिल ॲपवरील सर्वच 24 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. ॲपवर आतापर्यंत 37 तक्रारींची नोंद करण्यात आली. यापैकी 13 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आलेले नाहीत. तर उर्वरित 24 तक्रारींचे निरसन करण्यात आले. सर्वाधिक 6 तक्रारींची नोंद कामठी विधानसभा मतदारसंघातून करण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'उत्सव लोकशाहीचा, सहभाग नागरिकांचा', मतदार जनजागृती अभियानास विद्यार्थी, महिला आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद

Fri Apr 5 , 2024
मुंबई :- लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या या उत्सवात मुंबई उपनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत आहे. मतदार जनजागृतीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पथनाट्य, निवडणूक प्रतिज्ञा आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीच्या या उपक्रमाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com