आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्र दिवस’ कार्यक्रमामुळे राज्याच्या संस्कृतीची ओळख

नवी दिल्ली :- महाराष्ट्राची लोककला ही समृद्ध असून या माध्यमातून राज्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडते. या समृद्ध संस्कृतीची ओळख देशाला व जगाला व्हावी, या उद्देशाने आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्र दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी सायंकाळी करण्यात आले.

प्रगती मैदान येथे 42 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात आयोजित ‘महाराष्ट्र दिवस’ कार्यक्रमाचे उद्घाटन निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मनिषा वर्मा, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक फरोग मुकादम, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार व महाव्यवस्थापक विजय कपाटे उपस्थित होते.

मुंबई येथील ‘साईलीला कला मंच’ गृपच्या कलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. गणेश वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहाटेचे दर्शन घडविणारे वासुदेव नृत्य तसेच पंढरपूरच्या वारीचे दर्शन घडविणारे दिंडी नृत्य सादर करण्यात आले. थेट प्रेक्षकांमधून निघालेली वारकऱ्यांची दिंडी पाहून उपस्थितांनी उभे राहत दिंडीला मानवंदना दिली. बाळ शिवाजी जन्मोत्सव गीत, शेतकरी नृत्य, वाघ्या मुरळी, अभंग, कोळी नृत्य या लोककलांच्या सादरीकरणाने येथे उपस्थित रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. संताचे आध्यात्मिक विचार उलगडणारे भारूड आदींनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. विविध लोककला व लोकनृत्यांचा आविष्कार असणाऱ्या या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिबिंबच उभे राहिले आणि यास उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्राच्या राज्यगीताने झाली.

भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाचे दरवर्षी 14 ते 27 नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात येते. या मेळाव्यात दररोज सायंकाळी व्यापार मेळाव्यात सहभागी राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होत असते. व्यापार मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी ‘महाराष्ट्र दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यंदाच्या मेळ्यात 28 राज्ये, केंद्र शासित प्रदेश व 13 देश सहभागी झाले असून, 3500 उद्योजक सहभागी झाले आहेत.

NewsToday24x7

Next Post

तंत्रज्ञानाच्या मदतीने कर प्रणाली सक्षम व पारदर्शी करण्याची गरज - राज्यपाल रमेश बैस

Fri Nov 17 , 2023
– राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या ७७ व्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन नागपूर :- कृत्रिम बुध्दिमत्ता व इतर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन कर प्रणालीत अधिक सुलभता तसेच पारदर्शकता आणल्यास करदात्यांमध्ये विश्वास निर्माण होईल, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. येथील राष्ट्रीय कर अकादमीत भारतीय राजस्व सेवेच्या ७७ व्या तुकडीच्या प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करतांना राज्यपाल बैस बोलत होते. केंद्रीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com