‘उत्सव लोकशाहीचा, सहभाग नागरिकांचा’, मतदार जनजागृती अभियानास विद्यार्थी, महिला आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई :- लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या या उत्सवात मुंबई उपनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत आहे. मतदार जनजागृतीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पथनाट्य, निवडणूक प्रतिज्ञा आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीच्या या उपक्रमाच्या माध्यमातून मतदानाचे महत्व संबंधितांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी हे मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात मतदार जनजागृतीविषयक उपक्रम राबवित आहेत. नवमतदारांची संख्या वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

आजही जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ‘पथनाट्य’ आणि ‘निवडणुकीची प्रतिज्ञा’ अशा नाविन्यपूर्ण उपक्रमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मतदानासंदर्भात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठीही अभियानातून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

…यांनी घेतली निवडणुकीची प्रतिज्ञा आणि सहभाग

जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मतदान जनजागृती अभियान (स्वीप) अंतर्गत १७७ वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ‘एच पश्चिम’ विभागातील बचत गटांनी रेल्वे कर्मचारी वसाहत वांद्रे (पश्चिम), एफ उत्तर विभागात सायन सर्कल (सायन कोळीवाडा विधानसभा मतदार संघ) तसेच 176- वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील एच/पूर्व विभागातील बचत गटांनी एच/पुर्व विभाग कार्यालय प्रभात कॉलनी, सांताक्रुझ (पुर्व) याठिकाणी ‘निवडणूक प्रतिज्ञा’ घेऊन मतदानाचा हक्क बजावण्याचा निर्धार केला. महाविद्यालयातील नवमतदारांना मतदानाचे महत्व समजावे आणि त्यांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे यासाठी ‘मतदान अमूल्य दान’ या पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

163-गोरेगाव विधानसभा मतदार संघ येथे महानगरपालिका पी- दक्षिण विभागातर्फे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान जागृतीकरण अभियान अंतर्गत वनराई पोलीस स्टेशन पासून ते वनराई कॉलनी येथे मतदान जागृती अभियान फेरी काढण्यात आली. 177 वांद्रे (प.) सखी सहेली मेळावा, अंगणवाडी सेविका तसेच बचत गट यांच्यासमवेत मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. 27- मुंबई उत्तर – पश्चिम लोकसभा मतदार संघात 159- दिंडोशी विधानसभा मतदार संघातली आप्पा पाडा मालाड पूर्व येथे भरारी पथकाने स्वाक्षरी अभियान राबविले. या अभियानात सहभागी झालेल्या नागरिकांनी ‘….मी मतदान करणार’ अशी शपथ घेतली.

नव-विवाहित दांपत्याने घेतली मतदान करण्याची शपथ

27- मुंबई उत्तर – पश्चिम लोकसभा मतदार संघात 159 दिंडोशी विधानसभा मतदार संघातली आप्पा पाडा मालाड पूर्व येथे भरारी पथकाच्या स्वाक्षरी अभियानांतर्गत नव दाम्पत्यानी स्वाक्षरी करून ‘आम्ही जबाबदार नागरिक म्हणून मतदान करणार’ अशी शपथ घेतली. तसेच 176- वांद्रे पूर्व येथील अनुयोग विद्यालय ते खार स्टेशन परिसरात अनुयोग विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी, क्षेत्रीय अधिकारी, बीएलओ, पोलीस अधिकारी- पोलीस कर्मचारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, नागरिक, यांच्या मदतीने मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

याचबरोबर दिंडोशी येथे दीनानाथ नाट्य मंदिर विलेपार्ले येथे आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिरातून अंगणवाडी सेविकांनी प्रशिक्षण देण्यात आले. स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी मतदानाचा टक्का वाढण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी मतदारांचे कसे प्रबोधन करावे याबाबत त्यांना प्रशिक्षण दिले. जिल्हा निवडणूक अधिकारी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विषयक सर्व यंत्रणा आता जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी आणि प्रत्येक सुजाण नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी अधिक गतिमान झाली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अंगणवाडी सेविकांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत - स्वीपचे विशेष समन्वयक अधिकारी डॉ. सुभाष दळवी

Fri Apr 5 , 2024
मुंबई :- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढाविण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे. अंगणवाडी सेविकांनी समाजातील शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन स्वीपचे विशेष समन्वयक अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी केले.             लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com