नागपूर :- लोकसभा निवडणूकीची घोषणात होताच उमेदवारांनी प्रचाराचे बिगुल वाजवले आहे. इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनीही आज (१ एप्रिल) रोजी दक्षिण नागपुरातून आपल्या जन आशीर्वाद यात्रेद्वारे नागरिकांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या समस्या ऐकून घेत सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी नागरिकांकडूनही ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शहरात विकासाच्या नावावर होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास, मुलभूत सुविधांचा अभाव आदी समस्यांकडे नागरिकांनी लक्ष वेधून घेतले. यात्रेदरम्यान नागरिकांनी ठिकठिकाणी माल्यार्पण करुन निवडणूकीसाठी शुभेच्छा दिल्या.
सोमवारी सकाळी जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात राजाबाक्षा हनुमान मंदिर येथे माल्यार्पण करुन झाली. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन सत्रात जनआशीर्वाद यात्रेद्वारे ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी प्रामुख्याने ज्येष्ठ नेते अतुल लोंढे, गिरीष पांडव, किशोर कुमेरिया, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, सुभाष मानमोडे, गुड्डू तिवारी, प्रकाश गजभिये, दुनेश्वर पेठे यांच्यासह मोठ्यासंख्येत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
काँग्रेसच्या न्यायचे मतदारांकडून स्वागत
काँग्रेसकडून पाच न्यायाचे संकल्प घेऊन तरुण, शेतकरी, महिला, मजूर आणि भागीदारीचे जनतेकडून स्वागत होत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकासाचे मॉडल काँग्रेसने मांडले असून आमची कॉंग्रेसला साथ असल्याची ग्वाही यावेळी जनतेने दिली.
आज पश्चिम नागपूरात नागरिकांशी साधणार संपर्क
जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात मंजिदाना कॉलोनी गिट्टीखदान चौक येथून होईल. त्यानंतर चौबे कटिया भंडार- दिनशां फॅक्ट्री चौक-अनंत नगर चौक-अहबाब चौक – ज्वाला माता मंदिर – जाफरनगर चौक – अवस्थीनगर – प्राचीन शिव मंदिर रोड-कल्पना टॉकीज चौक-मानकापूर चौक-फरस चौक-झिंगाबाई टाकळी- बस्ती रोड ते पांडूरंग मंगल कार्यालय रोड-श्रीकृषअण मंगल कार्यालय रोड – गोधनी नाका रोडपर्यंत जाईल.
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची महाविकास आघाडीला साथ
आगामी लोकसभा निवडणूकीत अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना पाठींबा जाहीर केला आहे. या संदर्भात पक्षाने पत्रकही जारी केले आहे. संविधानाच्या रक्षणासाठी आपण महाविकास आघाडीसोबत आलो असून राज्यभर आमचे कार्यकर्ते महाविकास आघाडीसाठी प्रचार करणार असल्याचे अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने सांगितले आहे.