नागपूर :– विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आज एकूण सात उमेदवारांनी नऊ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. आतापर्यंत 13 उमेदवारांनी 19 नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत गुरुवार दि. 12 जानेवारी असून १६ जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये शिक्षक मतदार संघासाठी ५ जानेवारी पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत 13 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.
@ फाईल फोटो
बुधवारी सात उमेदवारांचे नऊ नामनिर्देशनपत्र
नागपूर शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी बुधवारी एकूण सात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यात वर्धा येथील अपक्ष उमेदवार रविंद्रदादा डोंगरदेव आणि बाबाराव उरकुडे यांनी प्रत्येकी एक नामनिर्देशनपत्र दाखल केले. नागपूर येथील अपक्ष उमेदवार प्रा. सुषमा भड आणि नरेंद्र पिपरे यांनी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. नागपूर येथील अपक्ष उमेदवार विनोद राऊत आणि वर्धा येथील महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाचे उमेदवार सतिश जगताप यांनी प्रत्येकी दोन नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
तत्पूर्वी, चंद्रपूर येथील अपक्ष उमेदवार रामराव चव्हाण यांनी पहिल्याच दिवशी (५ जानेवारी) एक नामनिर्देशनपत्र तर ९ जानेवारीला दोन असे एकूण तीन नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. चंद्रपूर येथील अपक्ष उमेदवार सुधाकर अडबोले यांनी ९ जानेवारीला दोन नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. गोंदिया येथील मृत्युंजय सिंह या अपक्ष उमेदवाराने एक नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. नागपूर येथील राजेंद्र झाडे यांनी समाजवादी ( संयुक्त) पक्षाकडून दोन नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. वर्धा येथील अपक्ष उमेदवार अजय भोयर आणि नागपूर येथील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दीपराज खोब्रागडे यांनी प्रत्येकी एक नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी ५ जानेवारीला अधिसूचना जारी होऊन नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १२ जानेवारी असून १३ जानेवारीला अर्जांची छाननी करण्यात येईल. उमेदवारांना १६ जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. ३० जानेवारीला सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे तर २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. ४ फेब्रुवारी पर्यंत निवडणूक कार्यक्रम प्रक्रिया संपणार आहे.