जी-20 चे विविध कार्यगट व त्यांचे कार्य

– गटा-गटातून साधला जातो संवाद

जी-20 या परिषदेला बळकटी आणण्याचे काम यातील विविध गट करीत असतात. नागपूरमध्ये जी-20 परिषदेत सी-20 म्हणजेच नागरी समाज संस्थांची परिषद होणार आहे. मुंबईत व्यापारी गटांची, पुण्यात शहरी सुधारणांची बैठक झाली आहे. जी-20 तील या गटांच्या संवादाची, समन्वयाची आणि त्यांच्या उपयोगितेची माहिती देणारा हा लेख.

जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचा समावेश असलेला जी-20 या आंतरराष्ट्रीय गटाचा कार्यप्रवाह फायनान्स (वित्त) व शेर्पा ट्रॅक तसेच एंगेजमेंट गृपमध्ये विभागला आहे.

फायनान्स ट्रॅक : या ट्रकमध्ये सदस्य देशांचे अर्थमंत्री आणि त्यांच्या मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर हे जी-20 राष्ट्रांच्या आर्थिक धोरणांची अंमलबजावणी पार पाडतात. गटाच्या बैठकांद्वारे जागतिक आर्थिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात येते.

शेर्पा : जी-20 सदस्य देशांचे वरिष्ठ अधिकारी शेर्पा या नावाने ओळखले जातात. ते जी-20 नेत्यांच्या वार्षिक शिखर परिषदेची तयारी करतात. तसेच शिखर परिषदेच्या आयोजनात व अजेंडातील बाबींवर चर्चा घडविण्यात समन्वय साधतात. निती आयोगाचे माजी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अमिताभ कांत हे भारताचे शेर्पा आहेत.

एंगेजमेंट गृप्स : जी-20 देशांतील नागरी समाज, उद्योजक, संसद सदस्य, थिंक टँक, महिला, युवक, कामगार, आणि विज्ञान आदिंना एकत्र आणणारे एंगेजमेंट गृप्स आहेत. या विषयी थोडक्यात जाणून घेवू या.

सिव्हिल-20 (सी-20): हा नागरी समाज संस्थांचा एक गट आहे. हा गट सामाजिक विकास, मानवी हक्क आणि लैंगिक समानता यासह विविध विषयांवर जी-20 ला शिफारशी करतो. सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्याचे काम या गटाद्वारे केले जाते. जगभरातील अशासकीय, सेवाभावी, नागरी समाज संस्थांना या गटामुळे जागतिक मंच उपलब्ध झाला आहे. जी-20 मध्ये नागरी समाज संस्थांच्या सहभागाची सुरुवात 2010 मध्येच झाली होती, मात्र अधीकृत गट म्हणून सी-20 ची स्थापणा 2013 मध्ये करण्यात आली. यावर्षी सी-20 गटाची प्रारंभिक परिषद नागपूर येथे येत्या 21 व 22 मार्च रोजी आयोजित करण्यात येत आहे.

बिझनेस-20(बी-20) : हा एक उद्योग सल्लागार गट आहे. जी-20 सदस्य देशांची आर्थिक वाढ आणि रोजगार वृद्धीसाठी हा गट शिफारसी देतो. या गटाची स्थापना 2010 मध्ये झाली. यात व्यापारी कंपन्या आणि व्यावसायिक संस्थाचा सहभाग आहे. यावर्षी भारतात होणाऱ्या बी-20 ची संकल्पना राईज (R.A.I.S.E.) ‘रिस्पॉनसिबल, ॲक्सलेरेटेड, इनोव्हेटीव, सस्टेनेबल, इक्वीटेबल बिझिनेस’ ही आहे.

पार्लमेंट-20 (पी-20) : 2010 मध्ये कॅनडाच्या यजमानपदाच्या काळात हा गट सुरू झाला. जी-20 सदस्य देशांतील संसद सभागृहाचे अध्यक्ष या गटाचे प्रतिनिधीत्व करतात. आप आपल्या देशात संसदीय कार्यप्रणालीचा अनुभव असणारे या गटाचे सदस्य जागतिकस्तरावरील शासनपद्धतीस आकार व दिशा देण्याचे कार्य करतात. पी-20 बैठकांतून जागतिकस्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राजकीय समर्थन निर्माण केले जाते.

थिंक 20 (टी-20): हा गट जी-20 साठी “आयडिया बँक” म्हणून काम करत विविध आर्थिक आणि सामाजिक मुद्यांवर धोरणात्मक शिफारसी देतो. मेक्सिकन अध्यक्षपदाच्या काळात हा गट वर्ष 2012 मध्ये सुरू करण्यात आला.

वुमेन (डब्ल्यु20): हा गट 2015 मध्ये तुर्कीच्या यजमानपदात सुरू झाला. लैंगीक समानतेच्या विचारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणारी धोरणे आखणे हे या गटाचे उद्दिष्ट आहे. महिलांचा नेतृत्व विकास, उद्योजकता, शिक्षण आदि क्षेत्रांमध्ये महिलांच्या कौशल्य विकासावर लक्ष केंद्रीत करण्यावर या गटाद्वारे भर देण्यात येतो.

युथ-20 (वाय20): 2010 मध्ये या गटाची पहिली परिषद पार पडली. तरूणांना भविष्यातील नेतृत्व म्हणून उभे करण्यासाठी जागतिक समस्यांबाबत जागरुकता वाढविणे, विचारांची देवाण-घेवाण करणे, चर्चा व संवादासाठी एक मंच उपलब्ध करून देण्याचे कार्य हा गट करतो.

लेबर 20 (एल-20): हा जी-20 देशांमधील कामगार आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संस्थांचा समूह आहे. कामगारांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने हा गट विश्लेषण आणि धोरणांची शिफारस करतो.

सायन्स-20 (एस-20) –हा गट 2017 मध्ये जर्मनीच्या अध्यक्षपदाच्या काळात स्थापन झाला. यात जी-20 देशांच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमींचा समावेश असतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अनुभव आणि प्रगतीची देवाण-घेवाण या गटाच्या माध्यमातून करण्यात येते.

सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन्स-20 (SAI-20) हा गट २०२२ मध्ये इंडोनेशियाच्या यजमानपदाच्या काळात स्थापन झाला. जी-२० च्या सदस्य देशांमध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि सुशासनास प्रोत्साहन देण्याची भूमिका हा गट पार पाडतो.

स्टार्टअप्स 20 –स्टार्टअप्स-20 एंगेजमेंट गृप यावर्षी यजमानपद भूषविणाऱ्या भारतदेशाने प्रस्तावित केला आहे. या गटाची पहिली बैठक 28 व 29 जानेवारी 2023 रोजी हैद्राबाद येथे पार पडली. जी-20 सदस्य देशांमधील स्टार्टअप्सना एक मंच प्रदान करून स्टार्टअप्स, कॉर्पोरेट्स, गुंतवणूकदार, नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या संस्था आणि इतर प्रमुख परिसंस्थेतील भागधारकांमध्ये समन्वय मजबूत करणे हे या गटाचे उद्दिष्टय आहे.

अर्बन 20 (यु20) : या गटाची स्थापना ब्युनोस आयर्स येथे 2017 मध्ये झाली. शहरांच्या विशिष्ट समस्यांवर विचार करून त्यावर उपाय सुचविण्याचे कार्य या गटाद्वारे केल्या जाते. शहरीकरणाच्या वाढत्या वेगामुळे 2050 पर्यंत जगात दोन तृतीयांश लोकसंख्या शहरी होण्याचा अंदाज पाहता शहरांमध्ये पर्यावरणीयदृष्ट्या जबाबदार वागणुकींना प्रोत्साहन देणे,पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करणे आदि विषयांवर चर्चा करून मार्ग काढण्यात येतो. पुणे येथे 13 व 14 फेब्रुवारी 2023 रोजी झालेली बैठक अर्बन-20 अर्थात यु-20 होती.

वरील प्रत्येक गट आपली विशिष्ट भूमिका बजावून गटा-गटातून समन्वय साधत जी-20 च्या एकूण उद्दिष्टांमध्ये योगदान देत असतो.

-गजानन जाधव

माहिती अधिकारी,माहिती व जनसंपर्क, नागपूर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

परसाड ग्रामपंचायत उपसरपंच पदाची फेरनिवडणूक बिनविरोध

Thu Feb 23 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नुकतेच 18 डिसेंबर ला कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक पार पडली त्यानुसार थेट जनतेतून 27 सरपंच तर 93 प्रभागातून 247 सदस्यांची निवड करण्यात आली.यातील सदस्यमधून निवड करण्यात येणाऱ्या उपसरपंच पदाची निवडणूक तीन टप्प्यात 6 ,9 व 10 जानेवारी 2023 पार पडली होती. यातील परसाड ग्रा प च्या उपसरपंच पदाची निवडणूक ही वादग्रस्त ठरली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com