समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेच्या विविध उपाययोजना – मंत्री शंभूराज देसाई

नागपूर :- हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरील वाहतुकीस शिस्त लावणे व अपघातांची संख्या कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताची चौकशी करण्याबाबतचा प्रश्न सदस्य महादेव जानकर यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री देसाई बोलत होते. याचर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य अनिल परब, सत्यजित तांबे, प्रा.राम शिंदे, प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला होता.

मंत्री देसाई म्हणाले की, अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाची 8 पथके व महामार्ग पोलीस विभागाची 14 पथके नियुक्त करण्यात आली आहेत. समृद्धी महामार्गावर वाहन चालक व प्रवाश्यांच्या प्रबोधनासाठी टोल नाक्यांवर समुपदेशन केंद्र उभारण्यात आले आहेत. यामधून रस्ता सुरक्षा जनजागृती केली जाते. वाहनचालकांचे समुपदेशन केले जाते.वाहनांची तपासणी व टायर तपासणी ही समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर केली जाते. प्रवासी बसमध्ये प्रवाश्यांना परवान्याची व वाहनाची माहिती सहजपणे दिसेल या करीता फिट-टू-ट्रॅव्हल असे बोर्ड प्रदर्शित केले जातात. अखिल भारतीय परवान्यावर व ऑल महाराष्ट्र वातानुकूलित कंत्राटी वाहनांची परिवहन विभागामार्फत नियमितपणे तपासणी मोहीम केली जाते.

ज्या 8 जिल्ह्यांमधून महामार्ग जातो त्या जिल्ह्यांमध्ये परिवहन विभागात प्रत्येकी 1 तपासणी पथकाची नेमणूक केली आहे. पथकांकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 8 वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पथकांमार्फत समृध्दी महामार्गावरील वाहतुकीस शिस्त लावणे, रस्ता सुरक्षा विषयक जागृती करणे, वाहनचालकांचे समुपदेशन करणे इत्यादी रस्ता सुरक्षा विषयक कार्ये करण्यात येतात. समृध्दी महामार्गावर 1 डिसेंबर 2023 पर्यंत जवळपास 4500 वाहन चालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील अपघातासंदर्भात वाहन चालक व प्रादेशिक परिवहन कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील 2 सहाय्यक मोटर निरिक्षक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सहाय्यता निधीतून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या परिवारांना आर्थिक सहाय्य दिले. रस्ता सुरक्षा उपाययोजना सक्रियपणे कार्यान्वित करण्यात आली.वाहनांची तपासणी आणि योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली, अशी माहितीही यावेळी देसाई यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित, पुढील अधिवेशन २६ फेब्रुवारी रोजी मुंबईत

Thu Dec 21 , 2023
नागपूर :- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईत होणार असल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत, तर अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधिमंडळाचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान, या अधिवेशनात विधानसभेत प्रत्यक्षात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com