डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन समाजासाठी दिशादर्शक – प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांचे प्रतिपादन
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसंपदेने भारताचा नवा इतिहास घडवला – डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांचे प्रतिपादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन नवसमाजाची निर्मिती करणारे – डॉ. प्रदीप आगलावे यांचे प्रतिपादन
नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागामध्ये दिनांक २७ मार्च २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘जनता’ वृत्तपत्र खंडांचा ग्रंथभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य-सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जनता खंड क्र. – १ व जनता खंड क्र. – २ हे दोन खंड ग्रंथभेट म्हणून दिले. या ग्रंथभेट कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे हे होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ग्रंथभेट कार्यक्रम उत्साहात पार पडला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘जनता’ साप्ताहिक प्रकाशित करण्याच्या संदर्भात सामंजस्य करार दि. १५ डिसेंबर २०१६ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये झाला होता. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने जनता खंड क्र.- १ व जनता खंड क्र. – २ असे दोन खंड अनुक्रमे २०२१ आणि २०२२ मध्ये प्रकाशित झाले. या दोन्ही खंडांच्या काही प्रती डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाच्या ग्रंथालयासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य-सचिव डॉ प्रदीप आगलावे यांनी ग्रंथभेट म्हणून दिल्या.
या ग्रंथभेट कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रा-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधन आज समाजाच्या सर्व थरांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपण सामूहिकपणे पार पाडली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन समाजासाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून डॉ. पूरणचंद्र मेश्राम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘जनता’ वृत्तपत्राला सर्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी नागपूर विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये करण्यात आलेल्या सामंजस्य करारासंबंधीची पार्श्वभूमी व त्यासंबंधीची भूमिका त्यांनी याप्रसंगी विशद केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ‘जनता’तील विचारसंपदा महाराष्ट्र शासनाने सर्व जनतेसमोर अग्रक्रम देऊन पोहोचवली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसंपदेने भारताचा नवा इतिहास घडवला असून उद्याच्या भारताला घडवण्यासाठी त्यांचे लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
डॉ. प्रदीप आगलावे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे सद्यस्थितीत प्रकाशित होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यावर प्रकाशझोत टाकला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य नवंसमाजनिर्मिती करणारे आहे. त्यांचे साहित्य जितक्या प्रमाणात समाजापर्यंत पोहोचेल तितक्या प्रमाणात समाजामध्ये जागृती येईल, असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
या ग्रंथभेट कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘जनता’तील लेखनामधून तत्कालीन महाराष्ट्रीय समाजाचा इतिहास प्रगट झाला असल्याचे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले. ‘जनता’तून प्रगट झालेला हा इतिहास आजच्या काळातील समाजाकरिता देखील तितकाच प्रेरक स्वरूपाचा आहे, असे वक्तव्य त्यांनी याप्रसंगी केले.
या ग्रंथभेट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सरोज डांगे यांनी केले तर आभार प्रा. मंगेश जुनघरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी डॉ आंबेडकर विचारधारा विभागातील प्राध्यापक डॉ. रमेश शंभरकर, डॉ. धनराज डहाट, प्रा. प्रीती वानखेडे तसेच अन्य सहकारी प्राध्यापक व विभागातील शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाला विभागातील विद्यार्थी तसेच विभागातील माजी विद्यार्थी यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.