दिव्यांग, ज्येष्ठ अन् कल्पक तरुणांची निवेदने, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला उसळली गर्दी

नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला दिव्यांग, ज्येष्ठ, तरुणांसह विविध संस्था, संघटनांच्या सदस्यांनी गर्दी केली. मंत्री महोदयांना भेटून निवेदने देतानाच लोकोपयोगी साहित्याची मागणी देखील करण्यात आली.

ना. गडकरी यांना प्रत्यक्ष भेटता येणार म्हणून खामला येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांची गर्दी उसळली. कुणी संजय गांधी निराधार योजनेसाठी, तर कुणी रस्त्याच्या कामांसाठी, कुणी नोकऱ्यांसाठी तर कुणी नावीन्यपूर्ण प्रयोगांचे प्रेझेंटेशन देण्यासाठी मंत्री महोदयांची भेट घेतली. गर्दीतील प्रत्येकाला व्यक्त व्हायचे होते. काहींच्या हाती मागण्यांची निवेदने होती, तर काही लोक केवळ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आले होते.

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिलांच्या संदर्भातील मागण्यांची निवेदने ना. गडकरी यांनी स्वीकारली आणि त्याचवेळी ‘आपण पुढाकार घेतल्यामुळे काम झाले,’ अशी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या नागरिकांच्या शुभेच्छाही त्यांनी स्वीकारल्या. वैयक्तिक कामांसह प्रशासकीय कामांपर्यंत विविध प्रकारच्या विषयांसाठी यावेळी निवेदने देण्यात आली.

ना. गडकरी यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. दिव्यांग बांधव-भगिनी तसेच ज्येष्ठ नागरिक सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात येत असलेल्या अडचणीचा विषय घेऊन आले. यासोबतच रेल्वे, महामार्ग, कृषी, सहकार, पर्यावरण, पाणीपुरवठा, ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्र व विभागांशी संबंधित विषय ना. गडकरी यांनी ऐकून घेतले. यावेळी अयोध्या यात्रेवर निघालेल्या सनातन रक्षक सेनेच्या वाहनाला ना.गडकरी यांनी शुभेच्छा दिल्या.

इलेक्ट्रिक स्कुटरचे स्टार्टअप

तामिळनाडू येथील कोईंबतूर शहरातील कार्तिकेय विश्वकर्मा या तरुणाने इलेक्ट्रिक स्कुटरचे स्टार्टअप सुरू केले आहे. ट्रायडन टेक नावाने त्याने कंपनी सुरू केली असून किक स्कुटर्स, इलेक्ट्रिक व्हेइकल, इलेक्ट्रिक बोट आदींमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरी देखील त्याअंतर्गत तयार होतात. या तरुणांनी आज ना. श्री. नितीन गडकरी यांची भेट घेऊन इलेक्ट्रिक स्कुटरचे प्रात्यक्षिक दाखविले. मंत्री महोदयांनी या तरुणांच्या प्रयत्नांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

भजन मंडळांना निःशुल्क साहित्य वाटप

ना.नितीन गडकरी यांच्या वतीने नागपुरातील विविध भजन मंडळांना निःशुल्क साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये टाळ, तबला आणि हार्मोनियमचा समावेश आहे. सार्वजनिक हनुमान मंदिर, जय माँ दुर्गा महिला मंडळ, ओंकारेश्वर महिला भजन मंडळ, भवानी माता भजन मंडळ, पुष्पांजली भजन मंडळ, कृष्णाई भजन मंडळ आदी मंडळांना वाटप करण्यात आले. नागपुरात खासदार भजन स्पर्धेच्या निमित्ताने अतिशय उत्तम उपक्रम आयोजित केल्याबद्दल भजन मंडळांनी ना. नितीन गडकरी यांचे आभार मानले.

NewsToday24x7

Next Post

भिक्षेकऱ्यांच्या पुनर्वसनावर अधिक भर द्या - आस्था निवारागृहला भेट देत आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले निर्देश

Mon Feb 12 , 2024
नागपूर :- नागपूर शहराला भिक्षेकरी मुक्त शहर करण्यासाठी भिक्षेकऱ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे, त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याची गरज असून, भिक्षेकऱ्यांच्या पुनर्वसनावर अधिक भर द्यावा असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी समाजविकास विभागाला दिले. नागपूर महानगरपालिकाद्वारा संचालित केंद्र शासन पुरस्कृत भिक्षेकरी सर्वसमावेशक पुनर्वसन प्रकल्प “आस्था निवारागृहला” आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी (ता.१२) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com