अन… ग्रामस्थ झाले बोलते…

Ø ‘जनसंवादातून सुशासनाकडे’ कार्यक्रमात नागरिकांनी मांडल्या समस्या

Ø पहिल्यांदाच दूरदृष्य प्रणालीद्वारे दुर्गम भागात प्रशासनाचा संवाद

Ø महिलांचा लक्षवेधी सहभाग

Ø जिल्हा मुख्यालयापासून 150 किलोमीटर अंतरावरील दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील जनतेशी थेट संवाद.

लोकाभिमूख कामातून जनतेचा विश्वास संपादन करा – जिल्हाधिकारी यांच्या यंत्रणेला सूचना

गडचिरोली :- जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा ग्रामीण भागात जेथील अनेक नागरिकांनी आजपर्यंत जिल्हास्तरीय वा तालुकास्तरीय कार्यालय बघीतले नाही, तेथील ग्रामस्थ आज ‘जनसंवादातून सुशासनाकडे’ या नाविन्यपूर्ण कार्यक्रमात प्रशासनाशी बोलते झाले. तंत्रज्ञानाचा वापर करत दूरदृष्‍यप्रणालीद्वारे दुर्गम भागातील या नागरिकांनी प्रथमच प्रत्यक्ष जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. सुसंवादाच्या या कार्यक्रमात नागरिकांनी त्यांच्या गावातील विकास कामात प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा, येणाऱ्या अडचणी व समस्या मांडून त्या सोडविण्याची साद घातली.

शासनाच्या योजनांची माहिती दुर्गम भागातील तळागाळापर्यंतच्या नागरिकांना व्हावी, या योजनांचा लाभ त्यांना प्रत्यक्ष मिळतो का याची खातरजमा प्रत्यक्ष त्यांचेकडूनच व्हावी, विकास प्रक्रियेत जनसहभाग वाढावा, नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करणे शक्य व्हावे, तसेच ग्रामस्थांच्या सर्वांगिण विकासाठी प्रशासकीय निर्णय प्रक्रीयेत जनसहभाग वाढावा या उद्देशाने प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘जनसंवादातून सुशासनाकडे’ या अभिनव उपक्रमाला आज नागरिकांचा विशेषत: महिलांचा लक्षणीय प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, पूनम पाटे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राहुल मिना, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, उपजिल्हाधिकारी विवेक साळुंखे, शिक्षणाधिकारी वासुदेव भुते (माध्यमिक), बी.एस.पवार (प्राथमिक), तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे संबंधीत तहसिलदार, गटविकास अधिकारी, तलाठी व तालुकास्तरीय यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क टॉवर उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अहेरी तालुक्यातील रेगुलवाही व येंकाबंडा, भामरागड तालुक्यातून हिंदेवाडा (म) व कारमपल्ली, एटापल्ली तालुक्यातून कमके(घोटसूर) व कोईनदुळ या दुर्गम भागातील ग्रामस्थ जिल्हा प्रशासन यांच्यात संवाद साधल्या गेला. शासन स्तरावर वरिष्ठ कार्यालय व अधिकाऱ्यांमध्ये दूरदृष्य प्रणालीद्वारे नेहमीच संवाद होतो. मात्र प्रथमच अतिदुर्गम भागातील जनतेशी अशा प्रकारे संवाद साधण्यात आला.

येथील नागरिकांनी गावातील रस्ते, विज, पाणी, आरोग्य, शाळा, रस्ते डांबरीकरण, पूल, समाजमंदिर, घरकुल याविषयावरील समस्या मांडल्या. महिलांनी देखील आरोग्यविषयक समस्या, गरोदर मातांच्या अडचणी, वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा, मनरेगाअंतर्गत कामे आदी बाबींवर मोकळेपणाने विचारणा करून प्रशासनाशी संबंधीत आपल्या अडचणी मांडल्या.

जिल्हाधिकारी यांनी या नागरिकांशी संवाद साधतांना सामुहिक वनहक्क दावे मंजूर झाले का? वनपट्टे किती मिळाले, वनसंवर्धन व वनव्यवस्थापन आराखडा तयार केला का, आधार कार्ड, बँक खाते, रेशन कार्ड, गॅस, जॉबकार्ड आहे का, गरोदर मातांची नोंदणी झाली आहे का, गरोदर मातांना शासनातर्फे बुडीत रोजगाराचे अनुदान मिळते याबाबत आपणास माहिती आहे का आदी प्रश्न विचारून बोलते केले. लहान मूल रडल्याशिवाय आई देखील दूध पाजत नाही त्याचप्रमाणे आपल्या विकासाठी आपले बोलने व समस्या शासनाकडे मांडने आवश्यक असल्याचे श्री भाकरे यांनी ग्रामस्थांना सांगितले.

तलाठी ग्रामसेवक यांनी संबंधीत गावातील समस्यांची नोंदवही तयार करून समस्यांचे निराकरणासाठी नियोजन करण्याचे व सर्व ग्रामस्थांच्या सहभागातून विकास आराखडा तयार करण्याचे निर्देशही श्री भाकरे यांनी यावेळी दिले. शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी लोकाभिमूख कामातून जनतेचा प्रशासनाप्रती विश्वास संपादन करा. विकास प्रक्रीयेत सक्रीय जनसहभाग सुनिश्चित करून जिल्हास्तर ते ग्रामस्तरापर्यत प्रयत्न करून नागरिकांना सक्षम करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी संवाद साधतांना महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळतो का, आरोग्याच्या काय समस्या आहे आदीबाबत माहिती जाणून घेत संबंधीत शासकीय योजनांची माहिती दिली.

काही महिलांनी माडिया भाषेतून आपल्या संवाद साधला. त्याबाबत दुभाषकाकडून माहिती समजवून सांगण्यात आली. सर्व शासकीय योजनांची एकत्रित पुस्तिका तयार करून वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

‘जनसंवादातून सुशासनाकडे’ या उपक्रमातून दुर्गम आदिवासी भागातील या नागरिकांना बोलते करणे, त्यांच्यामध्ये प्रशासनाप्रति विश्वास निर्माण करणे, शासकीय योजना अंमलबजावणीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या निराकरण करण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे असल्याचे श्री भाकरे यांनी सांगितले. आपल्या हक्काच्या शासकीस योजनांची माहिती जाणून घ्या, आपला आणि आपल्या गावाचा विकास तुमच्याच हाती आहे, हा महत्वाचा संदेश दुर्गम भागात पोहचविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

जनसंवाद कार्यक्रमाला उपरोक्त गाव व नजीकच्या गावातील ग्रामस्थ, स्थानिक ग्रामसेवक, आशा वर्कर, शिक्षक, तलाठी, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय अधिकारी सहभागी झाले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 51 प्रकरणांची नोंद

Fri Jun 14 , 2024
– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई    नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. गुरुवार (ता. 13) रोजी उपद्रव शोध पथकाने 51 प्रकरणांची नोंद करून 36 हजार 500 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com