– मनपा आयुक्तांची कठोर कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या लकडगंज आणि आशीनगर झोनमध्ये कार्यरत दोन स्वच्छता जमादारांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शिस्तभंगाची कारवाई करीत दोन्ही स्वच्छता जमादारांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
लकडगंज झोनमधील प्रभाग क्रमांक २३ मध्ये कार्यरत सफाई कर्मचारी, प्र. स्वच्छता जमादार राजेश जुमळे आणि आशीनगर झोनमधील प्रभाग क्रमांक २ मध्ये कार्यरत स्वच्छता जमादार रितेश उसरबर्से असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचा-यांची नावे आहेत.
मनपाच्या दहाही झोनमध्ये स्वच्छतेच्या तक्रारींच्या अनुषंगाने सर्व सहायक आयुक्त तसेच वरीष्ठ अधिका-यांद्वारे झोनमध्ये विविध ठिकाणी आकस्मिक भेट देउन पाहणी केली जात आहे. या पाहणीमध्ये कर्तव्यात कसूर करीत असलेले कर्मचारी आढळून आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जात आहे. लकडगंज झोन आणि आशीनगर झोनमधील आकस्मिक पाहणीमध्ये प्र. स्वच्छता जमादार राजेश जुमळे आणि स्वच्छता जमादार रितेश उसरबर्से हे दोघे कर्तव्यात कसूर करताना आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर नियमान्वये कारवाई करण्यात आली आहे.
मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त (शहर) आंचल गोयल यांनी दोन्ही स्वच्छता जमादारांच्या निलंबनाचे आदेश निर्गमित केले आहेत.