गडचिरोली :- सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी 68-गडचिरोली (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. डॉ. मिलिंद रामजी नारोटे (भारतीय जनता पार्टी) व डॉ. देवराव मादगुजी होळी (भारतीय जनता पार्टी) यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले. 67-आरमोरी (अ.ज.) व 69-अहेरी (अ.ज.) या दोन विधानसभा मतदारसंघात आज एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. तर 69-अहेरी (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात कालपर्यंत दोन अर्ज दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण चार नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
आज 24 ऑक्टोबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून 6 व्यक्तींनी 16 नामनिर्देशन अर्जाची उचल केली तर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून 7 व्यक्तींनी 19 अर्जाची आणि अहेरी मतदारसंघातून 6 व्यक्तींकडून 9 अर्जाची उचल करण्यात आली आहे. जिल्ह्यात तीन दिवसात एकूण 137 नामनिर्देश अर्जाची उचल झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.