नागपूर :- वन आणि वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनाचे कर्तव्य बजावित असतांना हौतात्म्य प्राप्त झालेल्या वनाधिकारी आणि वन कर्मचारी यांच्या स्मरणार्थ 11 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय वनहुतात्मा दिनाचे आयोजन वन विभागाचे राज्य मुख्यालय, वनभवन येथे करण्यात आले. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. वाय.एल.पी. राव यांच्या वनहुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात आली.
11 सप्टेंबर हा दिवस भारतीय इतिहासात निसर्ग पूजक असलेल्या राजस्थानातील विष्णोई समुदायातील 363 व्यक्तींना खेजरली गावातील खेजडी वृक्षांना संरक्षणासाठी सन 1738 यावर्षी दिलेल्या अतुलनीय प्राण बलिदानासाठी ओळखला जातो. राज्यात सुध्दा वनविभागातील वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी वनसंरक्षणाची जबाबदारी पार पाडत असतांना त्यांच्या जीवाची पर्वा न करता त्यांचा देह धारातीर्थी ठेवला. त्यासर्वांच्या अतुलनीय बलिदानाच्या स्मरणार्थ वनविभागाच्या मुख्यालयी वनभवन येथे वनहुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. यात रोजंदारी वनमजूर, वाहनचालक, वनरक्षक, वनपाल आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा समावेश आहे.
यावेळी उपस्थितांनी दोन मीनीट मौन पाळून तसेच स्मारकावर पुष्प वाहून वनहुतात्म्यांना भावपूर्ण श्रध्दांजली दिली. भारतीय वन सेवेतील वरिष्ठ अधिकारी व इतर अधिकारी, वनकर्मचारी मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.