– विद्यापीठातील आजीवन अध्ययन विभागात व्याख्यान
अमरावती :- आरोग्याची मोठी समस्या आज समाजापुढे उभी आहे, दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. त्याचे कारण वायूप्रदुषण, जलप्रदुषण, दुषित आहार इत्यादींचा प्रभाव शरीरावर पडतो, त्यामुळे अनेक प्रकारच्या व्याधीला सामोरे जावे लागत आहे व यातून वाचण्याकरिता विना औषधी उपचार असून वैकल्पिक चिकित्सा पद्धतीमध्ये विना औषधी उपचार केल्या जातात व त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, तसेच ही पध्दत कमी खर्चिक असल्यामुळे या चिकित्सा पद्धतींचा प्रचार आणि प्रसार मोठया प्रमाणात होत आहे, असे प्रतिपादन डॉ. अनिल चौधरी यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या पदव्युत्तर पदविका निसर्गोपचार आणि योगशास्त्र, पदव्युत्तर पदविका योगथेरपी अभ्यासक्रमाच्यावतीने आयोजित अतिथी व्याख्यानात केले. अध्यक्षस्थानी विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, प्रमुख अतिथी म्हणून व्याख्याते डॉ. अनिल चौधरी, डॉ. भरत भूषण शर्मा उपस्थित होते.
डॉ. श्रीकांत पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून विना औषधोपचार पद्धतींचे महत्त्व विद्याथ्र्यांना पटवून दिले व अशा कौशल्यावर आधारित उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपला कौशल्य विकास करुन स्वयंरोजगार निर्माण करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने करण्यात आली. अतिथींचे डॉ. श्रीकांत पाटील यांनी स्मृतीचिन्ह देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन प्रयोग निस्ताने, तर आभार नेहा माकोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता समन्वयक प्रा. आदित्य पुंड, डॉ. अश्विनी राऊत, प्रा. राहुल दोडके, प्रा. संदीप महल्ले, विद्याथ्र्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सर्व अभ्यासक्रमांचे समन्वयक, प्राध्यापक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.