– आदिवासी विकास विभागात समस्या निवारणार्थ सहविचार सभा
नागपूर :- आदिवासी विकास विभागातील कार्यरत अनुदानित व शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ सहविचार सभा आमदार सुधाकर अडबाले यांच्या उपस्थितीत अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर येथे नुकतीच पार पडली. आदिवासी विभागातील सर्व समस्या व प्रलंबित प्रकरणे ३० जूनपर्यंत निकाली काढण्यात यावी, असे निर्देश सभेतील चर्चेदरम्यान आमदार सुधाकर अडबाले यांनी दिले.
प्रस्तावित नविन शैक्षणिक सत्र २०२३-२०२४ मधे लागू होणारा वेळापत्रक रद्द करणे, समायोजन झाल्याशिवाय पदभरतीस परवानगी देण्यात येवू नये, समायोजन करताना प्रवर्गाची अट शिथिल करणे, सर्व कर्मचाऱ्यांची १ जुलै २०२४ ची वेतनवाढ नियमित करावी, GPF/DCPS कर्मचाऱ्यांच्या पावत्या, अनुदानित आश्रमशाळेतील कनिष्ठ महाविद्यालयातील (विज्ञान शाखा) येथिल कार्यरत पदावर पदोन्नती, रात्रकालीन चौकीदार यांना वेतनश्रेणी लागू करणे, १०, २०, ३०, आश्वासित प्रगती योजना शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागू करणे, शासकीय आश्रम शाळेच्या प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रशिक्षण देणे, शिक्षक-शिक्षकेत्तर (DCPS) कर्मचाऱ्यांचे प्राणकार्ड मिळणे, कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तिका अद्ययावत करून दुय्यम प्रत मिळणे, भानिनि परतावा/नापरतावा मिळण्यासाठी होणारी दिरंगाई दूर करणे, अनुदानित आश्रमशाळा भिसी प्रकल्प चिमूर येथील सर्व कर्मचाऱ्यांचे समस्या निकाली काढणे, अनुदानित आश्रम शाळा पावीमुरांडा प्रकल्प गडचिरोली येथील अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे तात्पुरते समायोजन शासकीय आश्रमशाळेत कायम करणे, प्रतिक्षेचा पूर्ण कालावधी कर्तव्य कालावधी म्हणून नियमित करून प्रतीक्षा कालावधीने वेतन मिळणे, परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तीवेतन व रुग्णता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन मंजुरीबाबत प्रस्ताव बोलविण्याबाबत, आदिवासी आश्रमशाळा ६ जूनऐवजी २६ जूनपासून सुरू करणे व इतर अनेक समस्या व वैयक्तिक प्रलंबित असलेल्या समस्यांवर सभेत चर्चा करण्यात आली.
या सर्व समस्या व प्रलंबित प्रकरणे ३० जूनपर्यंत निकाली काढण्यात यावे, असे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी दिले. सोबतच अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी सुद्धा सर्व प्रकरणे सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा केली व प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढणार असल्याचे आश्वस्त केले. सभेत सर्व नऊ विभागातील प्रकल्प अधिकारी काही प्रत्यक्ष तर काही ऑनलाईन जुडले होते. ही सभा चार तास चालली.
या सभेला प्रा. बी.टी. भामरे, जगदीश जुनघरी, उपायुक्त कुळमेथे, जोशी, विदर्भ माध्यमिक शिक्षण संघ नागपूरचे शहर अध्यक्ष विठ्ठल जुनघरी, गडचिरोली कार्यवाह अजय लोंढे, संघटनेचे पदाधिकारी भोजराज फुंडे, आर. टी. खवशी, नितीन माकोडे व मोठ्या संख्येने शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.