– आशा स्वयंसेविकांच्या ताप रुग्ण सर्वेक्षणाला सहकार्य करण्याचे आवाहन
नागपूर :- पावसाळा सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात डासांचा प्रकोप वाढतो. यातूनच डेंग्यू, चिकनगुनिया या सारखे जीवघेणे आजार डोके वर काढतात. डेंग्यू व चिकनगुनिया नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज असून, नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस “कोरडा दिवस” म्हणून पाळावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
नागपूर शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढता प्रसार रोखण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य विभाग सज्ज झाले आहे. शहरातील तापरुग्णांच्या सर्वेक्षणाला आरोग्य विभागाद्वारे सुरूवात करण्यात आली आहे. झोन निहाय आशा स्वयंसेविकाद्वारे हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणामध्ये आशा स्वयंसेविका घरोघरी भेट देऊन ताप रुग्णांची माहिती घेत आहे. नागरिकांनी सर्वेक्षणादरम्यान योग्य ती माहिती देत सर्वेक्षण कार्याला सहकार्य करावे असे आवाहन देखील आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
मनपा झोननिहाय आशा स्वयंसेविकाद्वारे सुरु असलेल्या सर्वेक्षण अभियानात आतापर्यंत १६२८९५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सातत्याने वाढणाऱ्या पावसामुळे किटकजन्य आजारात वाढ होत आहे. अशा आजार असलेल्या ठिकाणी वेळीच आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविकांद्वारे सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणामध्ये आशा स्वयंसेविका घरोघरी भेट देऊन तापरुग्णांची माहिती घेत आहेत. याशिवाय कंटेनर सर्वेक्षण अंतर्गत घरात आणि परिसरात पाणी जमा राहणाऱ्या वस्तूंची पाहणी केली जात आहे. बुधवार ७ ऑगस्टपर्यंत दहाही झोनमधील १६२८९५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. या घरांमध्ये ४३६९ दूषित भांडी आढळून आली. यात ६२७८ कुलर, १११२ टायर, ५२९० कुंड्या, २८८९ ड्रम, १२४० मडके, ८९४ पक्षी व प्राण्यांची भांडी आणि १७४५ इतर भांड्यांमध्ये डेंग्यूचा लारवा आढळून आला. लारवा आढळलेल्या ठिकाणी औषध टाकण्यात आले.
घरी आणि परिसरात डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ नये यासाठी नागरिकांनी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. डेंग्यूचा लारवा पाण्यात वाढत असल्यामुळे कुठेही पाणी जमा होऊ नये याची काळजी घ्यावी. कुलर, कुंड्या यातील पाणी दररोज बदलावे. याशिवाय ताप असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा असे आवाहन देखील डॉ. चौधरी यांनी यावेळी केले आहे.