शेतीमालाचे मूल्यवर्धन आणि विपणनासाठी प्रशिक्षण व विक्री केंद्र उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

– वाशिम येथे बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व 

शेतमाल विक्री केंद्राचे लोकार्पण

वाशिम :- शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्र स्थानिक शेतीमालाच्या विपणन व मूल्यवर्धनासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

वाशिम येथे बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार भावना गवळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार ॲड. किरण सरनाईक, महादेव जानकर, गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., पोलीस अधीक्षक अनुज तारे, सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर, कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अनिसा इस्माईल महाबळे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेती क्षेत्राच्या विकासासाठी व शेतक-यांच्या आर्थिक प्रगतीसाठी एक रूपयांत पीक विमा, किसान सन्मान योजना अशा अनेक योजना राबविण्यात येत आहेत. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतीमाल विक्री केंद्रामुळे येथील स्थानिक शेतीमालाला विक्रीची सुविधा, तसेच कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन होण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.

केंद्राच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान तसेच मूल्य साखळी विकासाचे प्रशिक्षण देण्यात येऊन शेतकऱ्यांच्या नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कोल्ड स्टोरेज, क्लिनिंग, ग्रेडीग, पॅकेजिंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.

सेंद्रिय शेतीमालाची विक्री करणाऱ्या रथाला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. केंद्रासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ५ कोटी ८४ लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्याचप्रमाणे, अडीच कोटी रुपये निधीतून शेतकरी प्रशिक्षण गृह निर्माण करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कृषी व संलग्न विभागाच्या तंत्रज्ञानविषयक गरजेवर आधारित प्रशिक्षण देणे, नाशवंत शेतमालास बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा केंद्राचा उद्देश आहे. केंद्राची क्षमता प्रीकूलिंग १० मे.टन, कोल्ड स्टोरेज ४० मे.टन, रायपेनिंग चेंबर १५ मे.टन, ग्रेडिंग अँड पॅकिंग, २ व्यावसायिक गाळे आहेत. जिल्ह्यातील एकूण ९० शेतकरी उत्पादक कंपनी, २ हजार २१४ शेतकरी उत्पादक गटांची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे ३० हजार २१० शेतकऱ्यांना संघटित करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी नगर परिषद निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार 

Mon Mar 4 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – नगराध्यक्षाची निवडणूक थेट जनतेतून,नव्याने होणार प्रभाग रचनाhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 कामठी :- कामठी नगर परिषदचा पंचवार्षिक कार्यकाळ 17 फेब्रुवारी 2022 रोजी संपला असून त्यानंतर कामठी नगर परिषद मध्ये प्रशासक पदाचा कारभार सुरू आहे.त्यानंतर सर्वाना नगर परिषद निवडणुकीची उत्सुकता आहे.मात्र आज दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून गेला एकीकडे लोकसभा निवडणुका होण्याची लगबग आहे मात्र कामठी नगर परिषद निवडणुकीचा कुठलंही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com