भारतात राष्ट्रवादाला पर्याय नाही – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

– महानगर भाजपचे प्रबुद्ध नागरिक संमेलन

नागपूर :– आपल्या देशात धर्मांची, जातींची वैविध्यता आहे. वेगवेगळ्या संस्कृती आहेत. कोणत्या देवाची उपासना करायची, याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण, राष्ट्रवादाला पर्याय नाही. प्रत्येकाच्या लेखी राष्ट्रहितालाच प्राधान्य असायला हवे. भाजपने कायम हीच आदर्श राजकीय संस्कृती स्वीकारली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी (रविवार) केले.

नागपूर महानगर भाजपच्या वतीने रविवारी प्रबुद्ध नागरिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले. अंबाझरी येथील नैवेद्यम सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजप शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, माजी आमदार प्रा. अनिल सोले, महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर, सीए संजय अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. या संमेलनाला नागपुरातील विविध क्षेत्रांमधील प्रतिष्ठित नागरिक आवर्जून उपस्थित होते. यात सीए, डॉक्टर, बांधकाम, शिक्षण, साहित्य आदी क्षेत्रांमधील नागरिकांचा समावेश होता. नितीन गडकरी म्हणाले, ‘जाती-पातींच्या पलीकडे विकासाची दृष्टी ठेवून लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी सर्वसामान्य जनतेला जागरुक करणे गरजेचे आहे. जनता सक्षम असेल तरच या देशाचा विकास शक्य आहे. विचारांसोबत विकासाची कटिबद्धताही असली पाहिजे.’ देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतात समाजवाद, साम्यवाद आणि भांडवलशाही विचार अस्तित्वात होते. आज संपूर्ण जगात या तिन्ही विचारांबद्दल संभ्रम आहे. भाजपने मात्र कायम राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. २०१४ मध्ये याच राष्ट्रवादाचा विचार घेऊन देशात मोदीजींच्या नेतृत्वात भाजपचे सरकार आले, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. रोजगार निर्माण करणारी अर्थव्यवस्था आवश्यक आहे आणि सरकारने तेच उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून गेल्या नऊ वर्षांमध्ये धोरणे राबविली, असेही  गडकरी म्हणाले.

आणीबाणीची आठवण

१९७५ मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे २५ जूनला देशात आणीबाणी लागली होती. त्यावेळी मी अकरावीत होतो. याच दिवसाने माझे जीवन बदलले, या शब्दांत नितीन गडकरी यांनी आणीबाणीच्या आठवणींना उजाळा दिला. ‘आणीबाणीमध्ये लोकशाही वाचविण्यासाठी देशाने मोठा संघर्ष केला. त्या काळात बोलण्याच्या अधिकारावर गदा आली होती. माध्यमांवर नियंत्रण आले होते. लाखो कार्यकर्ते तुरुंगात गेले. अनेकांच्या बलिदानामुळे लोकशाहीची पुनर्स्थापना झाली. नागपुरात राम जेठमलानी यांची सभा झाली होती. संपूर्ण महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमधील दिग्गज आणीबाणीच्या विरोधात पुढे आले होते. यामध्ये दुर्गा भागवत, पु.ल. देशपांडे यांचाही समावेश होता,’ अशीही आठवण गडकरी यांनी सांगितली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्र्यांकडून भर पावसात कोस्टल रोड व मिलन सबवेची पाहणी

Thu Jun 29 , 2023
सखल भागात साठलेले पाणी पंपिंगद्वारे साठवण टाक्यांमध्ये जमा करणारी यंत्रणा कार्यान्वित करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई :-  पावसामुळे सांताक्रुझ, मिलन सबवे या सखल भागामध्ये दरवर्षी पाणी साचून वाहतूक कोंडी होते. कालपासून मुंबईत सुरु झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागातील कार्यान्वित असलेल्या यंत्रणेची पावसात जावून प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच मुंबईत ज्या सखल भागामध्ये पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com