चोरी झालेले प्रात्यक्षिकासाठीचे ईव्हीएम कंट्रोल युनिट पोलिसांनी केले जप्त

मुंबई :- सासवड, जि.पुणे येथील तहसील कार्यालयात जनजागृतीसाठी ठेवलेल्या आणि चोरीस गेलेले ईव्हीएम कंट्रोल युनिट पोलिसांना सापडले आहे. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव तथा राज्याचे निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी, पुणे आणि पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार ३ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या सायंकाळी सहा ते ५ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या सकाळी १० वाजेदरम्यान जनजागृतीसाठी ठेवलेल्या ईव्हीएमपैकी एक कंट्रोल युनिट (BCUEL४१६०१) चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते. या अनुषंगाने निवासी नायब तहसीलदार, पुरंदर यांनी सासवड पोलिस स्टेशनमध्ये ५ फेब्रुवारी २०२४ रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिस स्टेशनकडून गुन्हा दाखल करुन तपास कामाला सुरवात करण्यात आली असून जिल्हाधिकारी, पुणे यांनी दि. ७ फेब्रवारी २०२४ रोजी सादर केलेल्या अहवालानुसार चोरीस गेलेले एक कंट्रोल युनिट पुणे ग्रामीण पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केले आहे. दोन संशयित भय्या ऊर्फ शिवाजी रामदास बंडगर, वय २१ व अजिंक्य राजू साळुंखे, वय २१ रा. माळशिरस ता.पुरंदर, जिल्हा पुणे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून १ कंट्रोल युनिट, ५ पेपर रीम आणि स्टेशनरी हस्तगत करण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून, सुरक्षा व्यवस्थेतील कमतरता विचारात घेऊन, पुणे जिल्हयातील उपविभागीय अधिकारी, पुरंदर, तहसीलदार, पुरंदर तसेच संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी यांना तत्काळ निलंबित करुन पुढील चौकशी करण्याचे आदेश ६ फेब्रुवारी २०२४ रोजी दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे सुध्दा निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही सुरु असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाच्या दि. १४.११.२०२३ रोजीच्या पत्रातील निर्देशांनुसार राज्यात दि.१०.१२.२०२३ ते दि.२८.०२.२०२४ या कालावधीत ईव्हीएम जनजागृती व प्रसिध्दीचा कार्यक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या प्रयोजनार्थ जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांच्या १० टक्के इतक्या संख्येत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट केवळ या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरावरील मुख्य सुरक्षा कक्षातून (Strong room) बाहेर काढण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये जनजागृती तसेच प्रसिध्दीसाठी वापरावयाच्या ईव्हीएम त्या मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी सुरक्षा कक्षात योग्य त्या सुरक्षेसह ठेवण्यात येतात. दिवसभरात प्रचार प्रसिध्दी झाल्यानंतर त्या पुन्हा सुरक्षा कक्षात आणण्यात येतात. त्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनकडून बंदोबस्त पुरविण्यात येतो.

या घटनेबाबत राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांनी सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक 6 फेब्रुवारी 2024 रोजी घेऊन सुरु असलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे भारत निवडणूक आयोगाला याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यात आला असल्याचे देशपांडे यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीस आयुक्तालय नागपूर शहर अंतर्गत अभिलेखावरील गुन्हेगारांची पडताळणी

Thu Feb 8 , 2024
नागपूर :-दिनांक ०७.०२.२०२४ चे 2 वा. ते 4 वा. दरम्यान पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस भवनाचे प्रांगणात नागपूर शहरातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, संघठीत टोळीचे सदस्य, घरफोडी, चोरी करणारे तसेच शरीराविरूध्द गुन्हे करणारे, वारंवार गुन्हे करणारे आरोपींना पडताळणी करीता पाचारन करण्यात आले होते,  पोलीस आयुक्त नागपूर शहर रविन्द्र सिंघल यांनी गुन्हेगारांची सविस्तर माहिती घेतली गुन्हेगारांना त्यांची सद्य परिस्थीती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com