– दीक्षाभूमीवर तीन दिवसीय बुद्ध महोत्सव
– मार्गदर्शन करताना भदन्त सुरेई ससाई
नागपूर :- भिक्खू संघाचे मुख्य कार्य धम्माचा प्रचार प्रसार करणे आहे. मात्र, भिक्खू संघ परित्राणपाठ आणि लग्नसमारंभ कार्यात व्यस्त दिसतो. त्यामुळे धम्माच्या कार्याला गती मिळत नाही. भिक्खू संघाने एकत्रित येवून धम्माचा प्रचार प्रसार करावा. धम्माचे कार्य गतिमान करावे, असे आवाहन परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले.
प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखाना यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी येथे आयोजित तीन दिवसीय बुद्ध महोत्सवात ससाई अध्यक्षस्थानाहून बोलत होते. कार्यक्रमाला बुद्धिस्ट सेमिनरीचे प्रमुख भंते धम्मसारथी, भंते नागवंश, भंते नागसेन, भंते धम्मविजय, भंते धम्मविजय उपस्थित होते.
बाबासाहेबांनी लिहलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे बौध्द बांधवांनी वाचन करावे, असे आवाहन भंते नागवंश यांनी केले. ते पुढे म्हणाले, बौध्द बांधवांच्या घरी बुद्ध आणि आंबेडकरी साहित्य मोठया प्रमाणात आहेत. सामान्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रंथांची गरजही नाही. सामान्यांनी केवळ बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन केल्यास धम्म सहज कळेल. या ग्रंथात बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनातील महत्वाच्या तीन घटनांचा म्हणजे जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण याचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे. याशिवाय राजा शुध्दोधन आणि माहामाया यांच्या विषयीची दुर्मिळ माहिती आहे. धम्माविषयी सखोल माहिती घेण्यासाठी या पवित्र ग्रंथाचे वाचन करावे, असेही ते म्हणाले. यावेळी भंते नागसेन, भंते धम्मविजय, भंते अश्वजित यांनीही धम्माविषयी सखोल मार्गदर्शन केले. संचालन आणि आभार भंते धम्मविजय यांनी केले.