नागपूर :- नागपूर शहरात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अवकाळी आलेल्या पावसामुळे संपूर्ण शहरात विपरीत परिस्थिती निर्माण झाली. शहराच्या अनेक भागांमध्ये झाडे पडली, कुठे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली. अशा परिस्थितीतून मार्ग काढून नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागाद्वारे मदतकार्य करण्यात आले व परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत परिस्थिती पूर्ववत आणण्यात आली.
मुसळधार पावसाला सुरुवात होताच देवनगर स्थित ऑरेंज हॉस्पिटलच्या मागच्या रोडवरील आणि स्वावलंबी नगर साई किराणा स्टोअर जवळ झाड पडले. माहिती मिळताच त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्राच्या पथकाने मदत कार्य केले. व विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. तसेच ज्ञानेश्वर नगर मानेवाडा रोड येथे नाल्यामध्ये गाय मृत अवस्थेत आढळून आली. नरेंद्र नगर अग्निशमन विभागाच्या जवानांनी नाल्यातून गायीला बाहेर काढले. याशिवाय सिव्हिल लाईन्स स्थित विभागीय कार्यालय येथे झाड पडले. माहिती मिळताच, मनपा मुख्यालयातील सिव्हिल लाईन्स केंद्राच्या पथकाने घटनास्थळी जाऊन रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करून विस्कळीत झालेली वाहतून सुरळीत केली.
शहरात निर्माण होणा-या आपात्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी मनपा सज्ज आहे. तरी नागरिकांनी कोणत्याही स्थितीमध्ये सहकार्यासाठी मनपाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती द्यावी, असे आवाहन मनपा तर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.
आपात्कालीन मदतीसाठी येथे संपर्क साधा
आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी मनपा मुख्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष तैनात करण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात ०७१२-२५६७०२९, २५६७७७७, २५४०२९९, २५४०१८८ या क्रमांकांवर किंवा अग्निशमन केंद्राच्या १०१, १०८ आणि ७०३०९७२२०० या क्रमांकांवर संपर्क साधावा.